The Kerala Story Effect : ‘द केरळ स्टोरी’ पाहिल्‍यानंतर तरुणीने थेट गाठले पाेलीस स्‍टेशन, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण?

The Kerala Story Effect : ‘द केरळ स्टोरी’ पाहिल्‍यानंतर तरुणीने थेट गाठले पाेलीस स्‍टेशन, जाणून घ्‍या काय आहे प्रकरण?

इंदूर (मध्य प्रदेश), पुढारी ऑनलाईन : इंदूरमध्ये एका 23 वर्षीय तरुणाला त्याच्या मैत्रिणीवर बलात्कार  आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 'द केरला स्टोरी' हा चित्रपट पाहिल्यानंतर पीडित तरुणीने थेट खजराना पोलिस स्टेशन गाठले. प्रेमाच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्या  तरुणाविरोधात फिर्याद  दिली. पाेलिसांनी संशयित तरुणाला अटक केली आहे. ( The Kerala Story Effect )

चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर पीडित तरुणी थेट पाेलीस ठाण्‍यात

१९ मे रोजी इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन परिसरात प्रियकराबरोबर 'लिव्ह इन'मध्ये राहणारी तरुणी 'द केरला स्टोरी' (The Kerala Story Effect) हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. चित्रपट पाहताना तिला वाटले की, आपल्यासोबतही असेच घडत आहे.  चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर तिने थेट खजराना पोलीस ठाण्यात गाठले. प्रियकर मोहम्मद फैजानविरुद्ध लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल केला. पीडितेने फिर्यादीत म्‍हटलं  आहे की, 'फैजानने माझ्याशी नावाने बदलून मैत्री केली  नंतर लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.' सध्या पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

पीडितेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 'माझी फैजान खानशी चार वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यानंतर त्याने माझ्यावर बळजबरी करून मला घर बदलण्यास भाग पाडले. मी  प्रेमाखातर आई-वडिलांपासून फारकत घेतली. एका गावात घर घेऊन तिथे 'लिव्ह इन'मध्ये राहू लागले. यादरम्यान फैजानने मला आश्वासनही दिले की, तो लवकरच माझ्याशी लग्न करेल. काहीकाळ आमच्यात सर्व काही ठीक होते, फैजानने माझ्यावर धर्मांतर करण्‍यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. आमच्यात जोराचे वाद झाले. पण त्याने पुन्हा मला लवकरच लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे मी त्याला विरोध केला नाही.

जीवे मारण्‍याची धमकी

फैजान बहुतेक वेळा माझ्या घरीच राहायचा, एके दिवशी फैजान माझ्या घरी आला आणि पहाटे मंदसौरला जायचे आहे असे सांगून तो इथेच झोपला. तो अचानक पहाटे चार वाजता उठला. मलाही झोपेतून उठवले. धर्मपरिवर्तन करण्‍यासाठी माझ्‍यावर दबाव आणू लागला.  18 मेची ती पहाट होती. मी त्याला स्पष्ट नकार दिला.  त्‍याने मला मारहाण केली आणि इस्लामचा स्वीकार केला नाही तर मला, माझ्या भावाला आणि आईलाही जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.  मी खूप घाबरले होते. कशीबशी मी फैजानची समजूत घातली. दुपारनंतर आम्ही घराबाहेर पडलो दोघेही 'द केरला स्टोरी' पाहायला गेलो; पण चित्रपट पाहिल्यानंतर आमच्यात खूप भांडण झाले. घरी आल्यानंतर मला पुन्हा मारहाण केली. चित्रपट पाहून माझे डोळे उघडले होते, त्यामुळे फैजान घराबाहेर पडताच क्षणाचाही विलंब न करता मला पोलिसांचा आसरा घेणे आवश्यक वाटले आणि मी खजराना पोलिस स्टेशन गाठले,' असे या पीडितेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे.

संशयित तरुणावर गुन्‍हा दाखल

पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी फैजानविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. खजराना पोलिस स्टेशनचे प्रभारी दिनेश वर्मा यांनी सांगितले की, 'पीडितेच्या तक्रारीच्या आधारे संशयीत आरोपी फैजान खानविरुद्ध धर्मांतरासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयीत आरोपीची चौकशी करण्यात येत आहे.'

या प्रकारानंतर मध्‍य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'इंदूरमधील तरुणीने द केरला स्टोरी' (The Kerala Story Effect) हा चित्रपट पाहून धाडसाने लव्ह जिहादची तक्रार दाखल केली आहे. ममतादीदी, चित्रपटाचा समाजावरील हा सकारात्मक प्रभाव आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही तुम्ही प. बंगालमध्ये चित्रपट प्रदर्शित करत नाही. केरला स्टोरीतून एका तरुणीचे मत बदलले आणि तिने आपल्यावरील अत्याचाराला वाचा फोडली.'

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news