2000 च्या नोटा अन् सोने 70000! बाजारात पसरली अफवा; योग्य दरातच खरेदीचे आवाहन | पुढारी

2000 च्या नोटा अन् सोने 70000! बाजारात पसरली अफवा; योग्य दरातच खरेदीचे आवाहन

सावेडी (नगर), पुढारी वृत्तसेवा : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बँकेत जमा करण्याचे किंवा बदलून घेण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना दररोज फक्त वीस हजार रुपये बदलून मिळतील, असे आदेश आहेत. त्यामुळे दोन हजारांच्या जास्त नोटा असणार्‍या ग्राहकांकडून सराफ बाजारात प्रतितोळा 70 हजार रुपये आकारण्यात येत असल्याची अफवा पसरली आहे. मात्र या अफवेला बळी न पडता दोन हजारांच्या नोटा असल्या तरीही रास्त भावातच सोनेखरेदी करावी, असे आवाहन सराफ व्यावसायिकांनी केले आहे.

सराफ बाजारात मे-जून महिन्यात असलेल्या लग्नतिथीसाठी वधू-वर पक्षांकडून सोने खरेदीसाठी ग्राहक येत आहेत. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याचे जाहीर झाल्या आणि मंगळवारपासून त्या बदलून घेण्याचे आवाहनही रिझर्व्ह बँकेने नागरिकांना केले आहे. कोणत्याही बँकेतून दररोज केवळ वीस हजार रुपये बदलण्याचे बंधन घाल्यात आले आहे.

मात्र दोन हजारांच्या जास्त नोटा ज्यांच्याकडे आहेत, अशा नागरिकांना रोख रक्कम देऊन सोनेखरेदी करता येईल, मात्र अशा ग्राहकांकडून सराफ बाजारात सोन्याला प्रतितोळा 70 हजार रुपये असा अतिरिक्त दर आकारला जात आहे, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये पसरली. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मात्र ही चर्चा केवळ अफवा असून, दोन हजारांच्या नोटा असणार्‍या कोणत्याही ग्राहकाकडून सराफ व्यावसायिकाकडून अतिरिक्त भाव आकारला जात नाही, अशी माहिती लोळगे ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रकाश लोळगे यांनी सांगितले. कायगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगावकर यांनीही, ग्राहकांनी अफवेला बळी न पडता कोणासही अधिक भाव न देता योग्य दरात सोने खरेदी करावे, असे सांगितले. दरम्यान, अनेक सराफ व्यावसायिक दोन हजारांची नोट स्वीकारतच नसल्याचेही बाजारातील काही ग्राहकांनी सांगितले.

Back to top button