छोट्या पडद्यावर 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत पिहूचा रोल करणारी व ग्लॅमरच्या दुनियेत लोकप्रिय झालेली सोनिया बलानी सध्या 'द केरला स्टोरी'मुळे बरीच चर्चेत आहे. वादाच्या भोवर्यात राहिलेल्या या चित्रपटात सोनियाने मित्रपरिवाराकडून इस्लाम मान्य करवून घेणार्या आसिफाचा रोल केला आहे.
रीलिज झाल्यानंतर पहिल्याच दिवसापासून 'द केरला स्टोरी'ने अक्षरश: धुमाकूळ घातला. ज्यांनी चित्रपट पाहिला, जवळपास त्या सर्वांना हा चित्रपट भावून गेला आहे. या चित्रपटात आसिफाची भूमिका धर्मांतरावर भर देणारी आहे. ग्रे शेड कॅरॅक्टर मानल्या जाणार्या या भूमिकेला तिने पुरेपूर न्याय दिल्याचे चाहत्यांचे मत आहे. अर्थात, हा असा रोल आहे की, एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे तिला टीकेला, ट्रोलिंगलादेखील सामोरे जावे लागले आहे.
ही भूमिका साकारणे खूपच आव्हानात्मक होते, असे दस्तुरखुद्द सोनियाने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. चित्रपटाच्या यशावर मी बेहद्द खूश आहे; पण हे यश साजरे करण्याची माझी अजिबात मानसिकता नाही, असे ती यावेळी म्हणाली.
आसिफाची भूमिका करणे का कठीण होते, हे स्पष्ट करताना तिने नमूद केले की, 'आसिफाने आत्महत्या करणे आणि याच्याशी संलग्न सर्व घटना, सीन या माझ्यात इतक्या रुतल्या की, घरी पोहोचल्यानंतर देखील मी त्याच मानसिकतेत असायचे.' या चित्रपटात आसिफाचा स्वार्थ व चातुर्याचे कॅरॅक्टर आहे. 'द केरला स्टोरी' रीलिज झाल्यानंतर तिला अनेक हेट कमेंटस्नादेखील सामोरे जावे लागले. सोशल मीडियावर येणार्या धमक्यांनी तर भीतीमुळे गाळण उडाल्यासारखी तिची स्थिती होती. ती म्हणते की, 'लोक खूप सेन्सेटिव्ह आहेत. एकसारखी धमकी येत असल्याने मी घराबाहेर जाणेदेखील बंद केले; पण काहीही झाले, तरी माझे कुटुंबीय माझ्या पाठीशी आहेत आणि त्यांनी माझी कधीही साथ सोडलेली नाही.'