MP Minister : मध्‍य प्रदेशमधील मंत्र्यांने महिला उमेदवाराच्या केसात घातला हात, व्हायरल video वरून काँग्रेसची टीका | पुढारी

MP Minister : मध्‍य प्रदेशमधील मंत्र्यांने महिला उमेदवाराच्या केसात घातला हात, व्हायरल video वरून काँग्रेसची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क

मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील रेंगाव विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा जोरदार प्रचार सूरू आहे. या प्रचारा दरम्यान भाजपचे मंत्री बृजेंद्रसिंह यांच्या कृत्यामुळे राज्‍यात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. शिवराज सिंह चव्हाण यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री बृजेंद्र सिंह (MP Minister brijendra pratap singh) यांचा चष्मा विधानसभा उमेदवार असलेल्या महिलेच्या केसात अडकला. तो काढतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावर काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.

MP Minister brijendra singh : व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

सोशल मीडियावर त्यांच्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. प्रचार सभेत मंत्री बृजेंद्र सिंह आपला चष्मा शोधतात. यावेळी त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने ष्मा समोर असलेल्या महिलेच्या केसात अडकल्याचे दाखवले. त्या महिलेच्या बरोबर मागे असलेल्या मंत्र्यांनी त्या महिलेले कोणतीही कल्पना न देत थेट तिच्या केसात हात घालत चष्मा काढताना या व्‍हिडिओमध्‍ये दिसत आहे. दरम्यान,  रेंगाव विधानसभेच्या महिला उमेदवाराबराेबरही भाजपचा एक नेता प्रचार सभेत गैरवर्तन करत असल्‍याचा फोटो काँग्रेसने  शेअर केला आहे.

काँग्रेसकडून जोरदार टीका

मध्य प्रदेशच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्‍यक्षा अर्चना जयस्वाल यांनी म्‍हटलं आहे की, भाजप महिला सशक्तीकरणचा मोठा देखावा करण्यात पटाईत आहे. व्‍हायरल व्हिडिओ आणि फोटोवरून भाजपची वास्तविकता दिसून येते. भाजपकडून संबंधित मंत्र्यावर कारवाई का केली नाही, अशी विचारणाही त्‍यांनी केली आहे.

भाजपकडूनही काँग्रेसला प्रत्‍युत्तर

मध्य प्रदेश भाजपचे सचिव रजनीश अग्रवाल यांनी म्‍हटलं आहे की,  असली विचारसरणी फक्त काँग्रेसच्या नेत्यांच्या विकृत डोक्यातूनच येत असते. ही विचारसरणी विकृती दर्शवणारी आहे. संबंधित महिला उमेदवाराचा काँग्रेसकडून मोठा अपमान केल्याचा झाला आहे.

Back to top button