लसीकरण : शंभर कोटींची आनंदवार्ता | पुढारी

लसीकरण : शंभर कोटींची आनंदवार्ता

जगातील अनेक देश कोरोना संकटाशी अजूनही झुंज देत असताना भारतासारख्या खंडप्राय देशात कोरोनाची लागण बर्‍यापैकी नियंत्रणात येत आहे. पुढील काही दिवसांत देशातील लसीकरण चा आकडा शंभर कोटींच्या पुढे जाईल. कोरोनाविरुद्धच्या देशाच्या लढाईतील हा मैलाचा दगड ठरणार असून त्यानंतर संपूर्ण लोकसंख्येचे म्हणजे 130 कोटींचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. लसीकरणापैकी 73.6 टक्के लोकांना कमीत कमी एक डोस देण्यात आला असून 29.7 टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यात आले. थोडक्यात, पहिला डोस देण्याच्या उद्दिष्टाच्या जवळ आरोग्य मंत्रालय आले असून दुसर्‍या डोससाठी पुढील काही महिने वेगाने प्रयत्न करावे लागतील. देशी-विदेशी कंपन्यांकडून सध्या मोठ्या प्रमाणावर लसीची निर्मिती होत असल्याने लसीकरणाच्या मोहिमेला वेग आला. मोहीम पुढे सरकेल तसतसे कोरोनाचे संकट कमी होईल; पण नागरिकांनी लसीकरणाचा शेवटचा टप्पाही पूर्ण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संकटाची सुरुवात झाली. गेले दीड वर्ष हाहाकार उडविल्यानंतर कोरोना आता काहीसा सुस्तावला आहे. कोरोनाने देशाला अक्षरशः वेठीला धरलेे. सुरुवातीचे तीन महिने देशव्यापी लॉकडाऊन व त्यानंतर राज्या-राज्यांनी तेथील परिस्थितीनुसार लादलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले. चालू वर्षाच्या सुरुवातीला कोरोना नियंत्रणात येत आहे, असे वाटत असतानाच एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना संकटाने पुन्हा डोके वर काढले. पहिल्या लाटेपेक्षाही दुसर्‍या लाटेने मोठे नुकसान केले. प्रामुख्याने युवावर्गाचा त्यात मोठ्या प्रमाणावर बळी गेला. सुदैवाने जूनपासून रुग्णसंख्या आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले. सध्या परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात असून दैनिक रुग्णसंख्यावाढीचा आकडा 15 हजारांच्याही खाली आला आहे. गेल्या दीड वर्षात देशभरात कोरोनाने साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला. अलीकडील काही दशकांत इतर कोणत्याही आजार अथवा संक्रमणाने केलेले नसेल इतके नुकसान कोरोनाने केले. महाराष्ट्रातील मृत्यूंची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र, राज्य सरकारांनी चालविलेल्या अथक प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. सुरुवातीचा बराच काळ लस विकसित करण्यात, तिचे उत्पादन वाढविण्यात आणि तिची वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात गेला; मात्र आज देशाची गरज भागवून विदेशाला पुरवठा केला जाईल, इतक्या मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन सुरू आहे. युद्धपातळीवर काम करीत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यासारख्या कंपन्यांना त्याचे बरेचसे श्रेय जाते.

दुसरीकडे आरोग्य व्यवस्थेतील लोकांनी दिलेले योगदानही कधीही विसरता येणार नाही. प्रसंगी प्राणाची आहुती देऊन या क्षेत्रातील लोकांनी कोरोनावर मात करण्यास मदत केली. भारताच्या लसीकरण मोहिमेचे यश पाहून जगातील अनेक देशांनी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक आरोग्य संघटनेने तोंडात बोट घातले आहे. किंबहुना अनेक देशांनी लसीसाठी आता भारताकडे मागणी करण्यास सुरुवात केली आहे. भारतातील लसीकरणाचे उद्दिष्ट आता डोळ्यांसमोर असले, तरी अजूनही आपल्याला लहान मुलांच्या लसीकरणाची मोहीम मुळापासून राबवायची आहे. त्यामुळे या मोहिमेवर केंद्र आणि राज्य सरकारांनी लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. लहान मुलांच्या लसीकरणाची कोणतीच घाई नसल्याचे व त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली नसल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांचे म्हणणे. साधारणतः आगामी नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून लहान मुलांच्या लसीकरणाचे काम सुरू होण्याचे संकेत याआधीच सरकारने दिलेे आहेत. तोपर्यंत लहान मुलांसाठीच्या लसी बाजारात आलेल्या असतील. सध्या अनेक देशांनी लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात केली आहे. जोवर लहान मुलांसाठी ही मोहीम सुरू होत नाही, तोवर प्रौढांसाठीच्या लसीकरणाचे बरेचसे काम पूर्ण होऊ शकते. जागतिक लसीकरण मोहिमेवर नजर टाकली, तर चीन सध्या जगात 222 कोटी लोकांना लस देऊन सर्वात आघाडीवर आहे. त्यानंतर भारत, अमेरिका, ब्राझील, जपान आणि जर्मनी यांचा क्रमांक लागतो. लसीकरण मोहिमेत सुरुवातीच्या टप्प्यात असंख्य अडथळे आलेे. दुसर्‍या लाटेनंतर तर अपुरा लसपुरवठा, नियोजनातला अभाव आदी कारणांमुळे लोकांना लस घेण्यासाठी अतोनात त्रास सहन करावा लागला; मात्र त्या आव्हानांवर मात करीत ही मोहीम आता योग्य वळणावर येऊन ठेपली आहे. अवघ्या तीनशे दिवसांच्या आत शंभर कोटी लोकांना डोस देण्याचे उद्दिष्ट साध्य झालेे. सरासरी काढली, तर 27 लाख लोकांना दररोज डोस देण्यात आलेे. सिक्किम, हिमाचल प्रदेश, गोवा यासारख्या राज्यांबरोबरच जम्मू-काश्मीर, लडाख, चंदीगड, लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकतरी डोस घेणार्‍या लोकांची संख्या शंभर टक्क्यांच्या वर गेलेली आहे. तुलनेने मोठ्या असलेल्या आणि लोकसंख्या जास्त असलेल्या राज्यांमध्ये पूर्ण लसीकरण होण्यास वेळ लागणार आहे; मात्र या राज्यांनीदेखील लसीकरण मोहिमेच्या द़ृष्टीने जे यश प्राप्त केलेे, ते वाखाणण्यासारखे आहे. मुंबईसारख्या अवाढव्य पसरलेल्या महानगरातील कोरोनाला ब्रेक लावण्यात महापालिकेला यश आले असून रविवारी एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नव्हता. या आनंदवार्ता असल्या, तरी संकट अद्याप टळलेले नाही. वाढत्या लसीकरणाचे हे परिणाम आहेत. कोरोनाविरुद्धची एक लढाई जिंकल्याचे ते मोजमाप आहे; मात्र दोन्हीही डोस घेतलेल्यांचे प्रमाण आजही समाधानकारक नाही, तसेच महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांच्या काही भागांतील कोरोनाचा मुक्काम ही धोक्याची घंटा मानावी लागेल. धोका टळला; मात्र संकट कायम, अशी स्थिती आहे. त्यावर संपूर्ण लसीकरणानेच मात करता येऊ शकेल.

Back to top button