

पुणे, पुढारी वृत्तसेवा : फिल्म इंडस्ट्रीमध्ये शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी कोंढव्यातील एका 31 वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर बाळू निकम (वय-32, रा. जिजाऊ बिल्डींग, नर्हेगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2017 पासून 16 ऑक्टोबर 2021 पर्यंत फिर्यादी व आरोपीच्या घरी सुरु होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर निकम हा यू-ट्यूबवर शॉर्ट फिल्म बनवितो. त्याने काही गाणीही बनविली आहेत. या शॉर्ट फिल्ममध्ये काम देण्याच्या बहाण्याने त्याने फिर्यादी यांच्याशी जवळीक निर्माण केली. युट्युबवर बनविलेल्या शॉर्ट फिल्मची गाणी त्यांना दाखवून त्यात काम मिळवून देण्याचा बहाणा करुन फिर्यादीला जाळ्यात खेचले.
त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करुन वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. या त्रासाला कंटाळून त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.