Karnataka Election 2023 : चला मतदानाला, आमदार निवडायला! कर्नाटकात आज मतदान | पुढारी

Karnataka Election 2023 : चला मतदानाला, आमदार निवडायला! कर्नाटकात आज मतदान

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सर्व 224 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान होईल. त्यासाठी निवडणूक कर्मचारी नियोजित मतदान केंद्रांवर मंगळवारीच पोहोचले. एकूण 5.31 कोटी मतदार 2,615 उमेदवारांचे राजकीय भविष्य ठरवणार आहेत. निवडणूक बंदोबस्तावर दोन लाखांहून पोलिस तैनात करण्यात आले आहेत.(Karnataka Election 2023)

सत्तारूढ भाजप, विरोधी पक्ष काँग्रेस, निजद, आप, सीपीआयएम आणि अपक्ष उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, सिद्धरामय्या, जगदीश शेट्टर, केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार, लक्ष्मण सवदी, रमेश जारकीहोळी, प्रियांक खर्गे, कृष्ण बैरेगौडा, रमेशकुमार यांच्यासह अनेक दिग्गज रिंगणात आहेत; तर माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा प्रथमच रिंगणात नाहीत. (Karnataka Election 2023)

बेळगाव जिल्ह्यात ४४३९ मतदान केंद्रे, दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त (Karnataka Election 2023)

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बुधवारी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मंगळवारी दुपारीच निवडणूक कर्मचार्‍यांनी मतदान केंद्रांचा ताबा घेतला. दुपारी पावसाने हजेरी लावल्याने मतदान साहित्य वाटपावेळी धावपळ उडाली. मतदारांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यात एकूण 18 मतदार संघ असून, 187 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीसाठी 4439 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, एकूण 39 लाख 67 हजार 574 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ बुधवारी 10 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे. (Karnataka Election 2023)

जिल्ह्यात 18 मतदार संघ असून, पैकी कुडची, रायबाग अनुसूचित जाती, तर यमकनमर्डी अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. इतर मतदार संघ खुल्या गटासाठी आहे. 18 मतदारसंघांत एकूण 187 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये 174 पुरुष आणि 13 महिला आहेत. 301 मतदार संघ संवेदनशील असल्यामुळे विशेष पोलिस बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हवामान खात्याने आगामी तीन दवस पावसाची शक्यता वर्तवल्याने प्रशासनाने त्यासाठीही तयारी केली आहे. गळक्या मतदान केंद्रांवर ताडपत्री झाकण्यात आल्या आहेत. कौलारु मतदान केंद्रांसाठी ताडपत्री पाठवण्यात आल्या आहेत. (Karnataka Election 2023)

मतदान प्रक्रियेसाठी एकूण 21 हजार 688 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, पैकी 576 कर्मचारी मायक्रो ऑबझरर्व्हर म्हणून काम करणार आहेत. (Karnataka Election 2023)

मतदानसाठी बॅलेट युनिट 5 हजार 328, कंट्रोल युनिट 5 हजार 328 आणि व्हीव्हीपॅट यंत्रे 5हजार 774 तैनात ठेवण्यात आली आहे. 20 टक्के अतिरिक्त मतदान यंत्रे राखीव ठेवण्यात आली आहे. (Karnataka Election 2023)

मतदान साहित्य घेऊन मतदान कर्मचारी आज दुपारीच मतदान केंद्रांवर हजर झाले. काही ठिकाणी गळती दुरुस्तीचेही काम हाती घेण्यात आले. निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एकूण 10 हजार 913 पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेळगाव ग्रामीणसाठी सीपीएड मैदानाशेजारील वनिता विद्यालयात कर्मचार्‍यासाठी निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले. दुपारी पाऊस सुरु झाल्याने कर्मचार्‍यांची धावपळ उडाली होती. पाऊस थांबल्यानंतर वाटप पूर्ण करण्यात आले.

मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राजशेखर डंबळ म्हणाले की, निवडणूक साहित्यांचे वितरण सुरळीतपणे पार पडले आहे. कर्मचार्‍यांचे दोन वेळा प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. संवेदनशील मतदान केंद्राबाबत योग्य ती खबदारी घेण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यावर एक नजर

एकूण मतदारसंघ ः18 एकूण मतदार : 39 लाख 67 हजार 574

मतदान केंद्रे ः 4439 संवेदनशील ः 301 अतिसंवेदनशील ः 731 पोलिस कर्मचारी ः 10 हजार 913 निवडणूक कर्मचारी ः 21 हजार 688 मतदान केंद्राभोवती बंदी आदेश लागू मतदानाची वेळ ः सकाळी 7 ते सायं. 6 गत विधानसभा निवडणुकीवेळी झाले होते 75 टक्के मतदान राजकीय पक्षांना मतदान केंद्रापासून 200 मीटरवर एकच टेबल आणि दोन खुर्च्या ठेवण्याची परवानगी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच सखी, दिव्यांग व तरुणांसाठी एक मतदान केंद्र 13 मे रोजी आर. पी. डी. महाविद्यालयात मतमोजणी.

मतदार ओळखपत्र नसेल तर 12 पर्याय!

1. आधार कार्ड, 2. रोहयो जॉब कार्ड, 3. बँक पासबुक, 4. पोस्ट पासबुक, 5. आरोग्य विम्याचे स्मार्ट कार्ड, 6. वाहन परवाना, 7. पॅन कार्ड, 8. आरजीआयचे स्मार्टकार्ड, 9. पेन्शन प्रमाणपत्र, 10. केंद्र, राज्य सरकारी ओेळखपत्र, 11. आमदार, खासदारांनी दिलेले कार्यालयीन ओळखपत्र, 12. दिव्यांग, सामाजिक न्याय विभागाने दिलेले ओळखपत्र.

मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावून लोकशाही यशस्वी करावी. कुटुंबीयांसमवेत मतदान करण्यास गेल्यास सोयीचे होईल. मतदार ओळखपत्र नसल्यास पर्यायी प्रमाणपत्रे आहेत. मतदानासाठी दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. अडचणी आल्यास नजीकच्या निवडणूक अधिकार्‍याशी संपर्क साधावा.
– नितेश पाटील, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, बेळगाव


अधिक वाचा :

Back to top button