The Kerala Story : ‘केरला स्टोरी’ हे जनजागृतीचे माध्यम : देवेंद्र फडणवीस | पुढारी

The Kerala Story : ‘केरला स्टोरी’ हे जनजागृतीचे माध्यम : देवेंद्र फडणवीस

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक विदारक सत्य जनतेपुढे आले आहे. खरे तर हा केवळ एक सिनेमा नसून जनजागृतीचे माध्यम आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, मंगळवारी (दि.९) येथे केले. (The Kerala Story)

नागपूर येथे रात्री हा सिनेमा बघितल्यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. ते म्हणाले की, या सिनेमाच्या माध्यमातून एक विदारक सत्य या सिनेमाने मांडले आहे. कशाप्रकारे आज देश पोखरला जातोय, आमच्या भगिनींसोबत षडयंत्र होतेय, हे सर्वांसमोर आले पाहिजे. हा सिनेमा पाहिल्यावर अनेकांचे डोळे उघडतील. (The Kerala Story)

या सिनेमाच्या निर्मात्याला भर चौघांत फाशी दिली पाहिजे, या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाबाबत माध्यमांनी विचारले असता, फडणवीस म्हणाले की, आव्हाड असे बोलले असतील तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळविण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्यासाठी असे बोलून हिंदू समाजात रोष निर्माण होतो. हे वक्तव्य तपासून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल. (The Kerala Story)

दरम्यान, अजित पवारांसंदर्भात प्रकाश आंबेडकर काय बोलले, यावर मी नव्हे अजित पवारांनी प्रतिक्रिया द्यावी. भारतीय जनता पार्टीची कुणीही फसवणूक करु शकत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 आणि 2019 ला स्वप्न पाहिले. पण, ते पूर्ण झाले नाही आणि यापुढेही होऊ शकत नाही. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यव्यापी पक्षच नाही. शरद पवार यांना खूप लोकांचा अनुभव आहे, त्यामुळे ते काहीही बोलू शकतात. पण, मला असे वाटते की त्यांचा पक्ष एकसंध ठेवण्यासाठी त्यांना जी कसरत करावी लागते आहे, ती पाहिल्यावर अन्य पक्षांबद्दल त्यांनी बोलावे की बोलू नये, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात सांगितले.


अधिक वाचा :

Back to top button