Imran Khan Arrest : इम्रान खान समर्थक आक्रमक; लष्करासह ‘आयएसआय’ मुख्यालयावर हल्ला, नागरिकांवर गोळीबार | पुढारी

Imran Khan Arrest : इम्रान खान समर्थक आक्रमक; लष्करासह ‘आयएसआय’ मुख्यालयावर हल्ला, नागरिकांवर गोळीबार

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : इम्रान खान यांच्या अटकेचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटत आहेत. इम्रान खान समर्थक कमालीचे आक्रमक बनले असून, ते सर्वत्र जाळपोळ करत सुटले आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री झाल्याचे वृत्त आहे. रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयावर, पेशावरमधील फ्रंटिअर कॉर्प्सच्या मुख्यालयावर तसेच पाक गुप्तचर संघटना ‘आयएसआय’च्या मुख्यालयावरही इम्रान खान समर्थकांनी हल्लाबोल केला. ‘आयएसआय’च्या परिसरात जाळपोळ केली. (Imran Khan Arrest)

‘पीटीआय’ने लष्कराने नागरिकांवर गोळीबार केल्याचा दावा केला आहे. फैसलाबादेत सुरक्षा यंत्रणांच्या गोळीबारात 13 आंदोलक जखमी झाले आहेत. (Imran Khan Arrest)

आदोलकांनी रेडिओ पाकिस्तानच्या पेशावरमधील इमारतीला आग लावली. सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी (कलम 144) लागू केली आहे. इस्लामाबाद, कराची, लाहोरसह प्रमुख शहरांत इंटरनेट बंद करण्यात आले आहे. (Imran Khan Arrest)

आंदोलकांनी लष्कराच्या कोअर कमांडरच्या घरातही नासधूस तसेच लुटालूट केली. लष्कराच्या मुख्यालयाला इम्रान समर्थकांनी घेराव घातला आणि खान यांची सुटका होत नाही, तोवर आपण या ठिकाणाहून हलणार नसल्याचा पवित्रा घेतला. ठिकठिकाणी पोलिसांची वाहनेही समर्थकांनी जाळली.

लष्कराकडून झालेल्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू झाला असून, अन्य 3 मुले जखमी झाली आहेत. आंदोलकांवर लष्कराने गोळ्या झाडल्याचा दावा ‘पीटीआय’कडून करण्यात आला आहे. बलुचिस्तानातही आंदोलनादरम्यान पाकिस्तानी लष्कराने इम्रान समर्थकांवर गोळीबार केल्याचे सांगण्यात येते.

पाकिस्तानी हवाई दलाच्या मियाँवाली हवाईतळावरही इम्रान समर्थक चालून गेले. येथेही जाळपोळ केली. प्रचंड गोंधळ येथे झाला. येथून जवळच ‘इसिस’चे कार्यालय आहे.

  • लष्कराच्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू, तीन मुले जखमी
  • चार आंदोलकांना लष्कराने गोळ्या घातल्याचा आरोप
  • इस्लामाबाद, कराची, लाहोरसह प्रमुख शहरांत इंटरनेट बंद


अधिक वाचा :

Back to top button