Imran Khan Arrest : इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला; आगडोंब आणि हिंसाचार | पुढारी

Imran Khan Arrest : इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तान पेटला; आगडोंब आणि हिंसाचार

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाबाहेरच अटक करण्यात आल्यानंतर पाकिस्तानात आगडोंब उसळला असून, कराचीपासून पेशावरपर्यंत इम्रान यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहे. रावळपिंडीत ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांनी लष्कराच्या मुख्यालयावर हल्ल्लाबोल केला. तसेच ठिकठिकाणी पोलिस आणि लष्करी वाहनांची जाळपोळ सुरू केली. संतप्त कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी जागोजागी गोळीबार केला. (Imran Khan Arrest)

इम्रान खान त्यांच्याविरुद्ध दाखल 108 पैकी 2 गुन्ह्यांत जामीन मिळावा म्हणून मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातील बायोमेट्रिक रूममध्ये असताना निमलष्करी दलातील जवानांनी या रूमच्या काचा फोडून त्यांना अटक केली. लष्कराला माझी हत्या घडवून आणायची आहे, असा आरोप खान यांनी सातत्याने लावून धरल्यानेच त्यांना अटक करण्यात आल्याचे बोलले जाते. (Imran Khan Arrest)

पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या इम्रान खान यांच्या पक्षाने सत्ताधारी ‘पीएमएलएन’ (पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज) या पक्षाने खान यांचा ठरवून छळ चालविला असल्याचा आरोप केला आहे. खान यांच्या अटकेनंतर ‘पीटीआय’च्या अधिकृत अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून, अटकेनंतर खान यांना टॉर्चर केले जात असल्याचे त्यातून सांगण्यात आले आहे. अटकेनंतर ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. लाहोर येथे ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांनी लष्करातील एका कमांडरच्या घराची तोडफोड केली. घरातून हाती लागेल ते सामानही लुटून नेले. पेशावर, बन्नू आदी शहरांतून पोलिस तसेच ‘पीटीआय’ कार्यकर्त्यांत झटापट झाल्याचे वृत्त आहे. (Imran Khan Arrest)

खान यांनी उच्च न्यायालयात प्रवेश करताच निमलष्करी दल आणि सशस्त्र पथकेही त्यांच्या मागोमाग उच्च न्यायालयात दाखल झाली. न्यायालयाचे दार चिलखती वाहनांनी अडवून बंद करण्यात आले आणि काही वेळातच रेंजर्सनी इम्रान यांना पकडून बाहेर आणले.

अटकेची कारवाई का?

लष्कराच्या सांगण्यावरून गुप्तचर विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी वजिराबादेत माझ्या खुनाचा कट रचला होता, असा आरोप इम्रान खान यांनी अलीकडे केला होता. लष्कराने खान यांचा हा आरोप फेटाळून लावला होता. इम्रान यांनी मंगळवारीच एक व्हिडीओ जारी केला आणि आपल्या आरोपाचा पुनरुच्चार केला. यानंतर 4 तास उलटताच खान यांच्या अटकेची कारवाई झाली.

जमीन घोटाळ्यात अटक

अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान यांना अटक करण्यात आल्याचे कारवाईनंतर सरकारकडून सांगण्यात आले. हे प्रकरण विद्यापीठाशी (इम्रान यांच्या) संबंधित असून, इम्रान यांनी ते पंतप्रधान असताना विद्यापीठाला कोट्यवधी रुपयांची जमीन दिली होती. हा सगळा व्यवहार कायदेशीर तरतुदी डावलून झालेला होता. पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत उद्योजक मलिक रियाझ यांनी हे प्रकरण लावून धरले होते. मला अटकेची धमकी देऊन इम्रान आणि त्यांची (इम्रान यांची) पत्नी बुशरा बिबी ऊर्फ पिंकी पीरनी यांनी माझी कोट्यवधी रुपयांची जमीन स्वत:च्या नावावर करून घेतल्याचा आरोप मलिक रियाझ यांनी केला होता. बुशरा बीबीही रियाझ यांच्या मुलीला 5 कॅरेटच्या हिर्‍याच्या अंगठीसाठी धमकावत असे, असेही रियाझ यांनी पुराव्यानिशी (ऑडिओ रेकॉर्डिंग) समोर आणले होते.

इम्रान आणि त्यांची पत्नी बुशरा अल कादिर विद्यापीठात दोनच विश्वस्त आहेत. या विद्यापीठात 6 वर्षांत 32 विद्यार्थीच शिकल्याची नोंद आहे. या जमीन घोटाळ्यासह खान यांच्यावर एकूण 108 गुन्हे दाखल आहेत. यापैकी 4 अजामीनपात्र आहेत.

अटकेनंतर वकिलाला मारहाण

खान यांच्या अटकेनंतर त्यांच्या वकिलाला कोर्टाबाहेर मारहाण झाल्याचा आरोपही ‘पीटीआय’ने केला आहे.

भारतीय लष्कराने सीमेवर गस्त वाढविली

आमचे सैन्य पाकिस्तानातील परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. एलओसीसह आंतरराष्ट्रीय सीमेवर आम्ही गस्त, टेहळणीही वाढविलेली आहे, असे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने भारतीय संरक्षण मंत्रालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

लष्कराने आणले अन् लष्कारानेच डांबले!

2018 मध्ये इम्रान खान यांना लष्करानेच पंतप्रधान बनवले होते.
‘आयएसआय’प्रमुख लेफ्टनंट जनरल फैज हमीद यांच्या बदलीवरून तत्कालीन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी इम्रान यांचा वाद झाला होता.
पुढे लष्कराने शाहबाज शरीफ यांना मदत केली व गतवर्षी एप्रिलमध्ये इम्रान यांचे सरकार पाडले होते.

इम्रान खान यांना अटक का केली? मुख्य न्यायाधीशांची विचारणा

इम्रान यांना कोणत्या प्रकरणात आणि का म्हणून अटक करण्यात आली, अशी विचारणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी गृह मंत्रालयाचे सचिव तसेच इस्लामाबाद पोलिसप्रमुखांना उद्देशून केली आहे. खान यांच्या अटकेनंतर पोलिसप्रमुखांना 15 मिनिटांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही मुख्य न्यायाधीशांनी दिले. पोलिसप्रमुख न्यायालयात हजर झाले नाहीत, तर आम्ही पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना समन्स पाठवू, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

इम्रान खान यांच्या विरोधातील गंभीर प्रकरणे

1) पक्षासाठी बेनामी फॉरेन फंडिंग.
2) आईच्या नावावर उभारलेल्या शौकत खानम रुग्णालयासाठी मिळविलेला निधी पक्ष निधीत वळविला.
3) पाक पंतप्रधान म्हणून परदेशात मिळालेल्या भेटवस्तू फुटकळ रकमेत स्वत: खरेदी करून नंतर त्यांची कोट्यवधींत विक्री.
4) टॅरिन व्हाईट प्रकरण : इम्रान यांना त्यांच्या सीटा व्हाईट या प्रेमिकेपासून टॅरिन नावाची एक मुलगीही आहे आणि ही बाब अमेरिका तसेच ब्रिटनमधील न्यायालयांतून सिद्ध झालेली आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या उमेदवारी अर्ज आदी माहितीत मात्र इम्रान यांनी ही बाब दडविलेली आहे.


अधिक वाचा :

Back to top button