पुढारी ऑनलाईन : संरक्षण दल, सुरक्षा, गुप्तचर आणि तपास यंत्रणांच्या शिफारशीनुसार केंद्र सरकारने दहशतवादाविरोधात मोठी कारवाई केली आहे. केंद्राने १४ मेसेंजर अॅप्स ब्लॉक केले आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी गटांद्वारे या मेसेंजर अॅपचा दहशतवादी कारवायांमध्ये वापर करण्यात आल्याने (Blocks messenger apps) केंद्र सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे.
दहशतवाद्यांनी या मोबाईल मेसेंजर अॅप्सचा वापर करून संदेश पाठवले आणि पाकिस्तानकडून संदेश प्राप्त केले जात. या मोबाईल मेसेंजर अॅप्समध्ये (Blocks messenger apps) Crypviser, Enigma, Safeswiss, Wickrme, Mediafire, Briar, BChat, Nandbox, Conion, IMO, Element, Second line, Zangi, Threema यांचा समावेश आहे, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
या मेसेंजर अॅप्सचा (Blocks messenger apps) वापर काश्मीरमधील दहशतवादी त्यांचे समर्थक आणि ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGW) यांच्याशी संवाद साधण्यासाठी वापरत असल्याचे अनेक एजन्सींना आढळल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या अॅप्सचे भारतात प्रतिनिधी नाहीत आणि भारतीय कायद्यांनुसार आवश्यक माहिती मिळविण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जाऊ शकत नाही. एजन्सींनी विविध प्रसंगी अॅप व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतात संपर्क करण्यासाठी कोणतेही कार्यालय नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर केंद्र सरकारने ही कारवाई केली आहे.