

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणेकर प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर लगेचच पुढील ठिकाणी प्रवासासाठी आता सार्वजनिक वाहतुकीचीच फीडर सेवा मिळणार आहे. यासंदर्भातील सर्व्हेचे काम पीएमपी प्रशासनाकडून युध्दपातळीवर सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात मेट्रोतून उतरल्यावर लगेचच पीएमपीच्या बस उपलब्ध होणार आहेत.
अवघ्या काही महिन्यांतच पुण्यातून मेट्रोची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. त्यामुळे मेट्रोतून उतरल्यावर प्रवाशांना इतर निश्चित ठिकाणी जाण्यासाठी फीडर सेवा आवश्यक असणार आहे. ती फीडर सेवा पीएमपीकडून पुरविण्यात येणार आहे. त्याकरिता पीएमपी आपल्या ताफ्यातील 7 आणि 9 मीटर लांबीच्या बसचा वापर करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या अधिकार्यांकडून शहरात कोणत्या ठिकाणी फीडर सेवेची आवश्यकता भासणार आहे, याची पहाणी करण्यात येत आहे.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सर्व्हे सुरू.
कोणत्या मेट्रो स्थानकाखाली फीडर बसची आवश्यकता आहे.
प्रवाशांची संख्या कोणत्या मेट्रो स्थानकात जास्त आहे.
स्थानकाच्या कोणत्या परिसरातून मेट्रो प्रवासी येतात.
– प्रवाशांच्या संख्येनुसार आणि आवश्यकतेनुसार बस मार्गांची रचना.
फीडर बस सेवेचे मार्ग असणार वर्तुळाकार, प्रवाशांना सोडून आणि पुन्हा घेऊन बस मेट्रो स्थानकावर येणार.
मेट्रो आणि पीएमपी अधिकार्यांचा संयुक्त सर्व्हे
पुण्यात मेट्रोची सेवा लवकरच सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने मेट्रो प्रवाशांना मेट्रोतून उतरल्यावर फीडर सेवेची आवश्यकता भासणार आहे. त्याकरिता आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सर्व्हे करत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर आम्ही पीएमपीची फीडर सेवा सुरू करणार आहे.
– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल.