Pakistani terrorist : विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याची पाकिस्तानी दहशतवाद्याची कबुली | पुढारी

Pakistani terrorist : विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणल्याची पाकिस्तानी दहशतवाद्याची कबुली

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

दिल्ली, काश्मीरसह देशाच्या विविध भागात बॉम्बस्फोट घडवून आणल्याची कबुली दिल्लीत पकडण्यात आलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्याने ( Pakistani terrorist : ) दिली आहे. पोलिसांच्या विशेष शाखेच्या जाळ्यात सापडलेल्या मो. अशरफ नावाच्या या दहशतवाद्याने 2011 साली दिल्ली उच्च न्यायालयाची रेकी केली होती. यानंतर काही दिवसांतच न्यायालयासमोर बॉम्बस्फोट झाला होता. यामध्‍ये तीन लोक मृत्यूमुखी पडले होते. प्रत्यक्ष बॉम्ब पेरण्यात त्याचा हात होता की नाही, याबाबत तपास सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

रेकी करुन पाकिस्तानातील हँडलर्सना देत होता माहिती

पोलिसांच्या विशेष शाखेबरोबरच रॉ आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) अधिकार्‍यांकडून अशरफची चौकशी सुरु आहे.
( Pakistani terrorist : )अशरफ याने 2011 साली आयटीओस्थित दिल्ली पोलिस मुख्यालया तसेच आयएसबीटी आंतरराज्य बस डेपोची रेकी केल्याचीही कबुली दिली आहे. रेकी करुन ही माहिती तो पाकिस्तानातील आपल्या हँडलर्सना देत असे. जम्मू येथील बस स्थानकावर 2009 साली अशरफने बॉम्बस्फोट घडवून आणला होता. यात चार लोकांचा मृत्यू झाला होता. आयएसआयचा अधिकारी नासिर याच्या सांगण्यावरुन त्याने हा दहशतवादी हल्ला घडवून आणला होता, असेही तपासात स्‍पष्‍ट झाले आहे.

२०११ मध्‍ये केली होती दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयाची रेकी

२०११ साली अशरफने दिल्ली उच्च न्यायालयाची रेकी केली होती. त्यावेळचा बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातून दोन दहशतवादी आले होते, त्यातील एकाचे नाव गुलाम सरवर असे होते.

जम्मू-काश्मीरमध्ये पाच सैनिकांचीही हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये पाच सैनिकांचीही हत्या अशरफने घडवून आणली असून नासिरच्या सांगण्यावरुन त्याने काश्मीर खोर्‍यातून दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा पुरवठा केलेला आहे. अशरफ हा बनावट भारतीय ओळखपत्राच्या माध्यमातून दिल्लीतील लक्ष्मीनगर भागात राहत होता. स्लीपर सेलप्रमाणे तो काम करीत होता. त्याच्याकडून एके 47 रायफल, हातबॉम्ब आदी शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

( Pakistani terrorist : )बांगलादेशमधून आला भारतात

अशरफला बांगलादेशच्या माध्यमातून भारतात पाठविण्यात आले होते. येथे येऊन त्याने गाझियाबादच्या महिलेशी लग्न केले होते. दिल्ली परिसरात मौलानाप्रमाणे वावरणारा अशरफ धर्माच्या नावावर युवकांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी बनवित होता. काही युवकांना त्याने प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठविले असल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे.

हेही वाचलं का?

 

Back to top button