लखीमपूर घटनेची जबाबदारी केंद्रासह उत्तर प्रदेश सरकारला टाळता येणार नाही : शरद पवार | पुढारी

लखीमपूर घटनेची जबाबदारी केंद्रासह उत्तर प्रदेश सरकारला टाळता येणार नाही : शरद पवार

मुंबई, पुढारी ऑनलाईन

लखीमपूरमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. शेतकरी सांगत असतानाही त्यांचा आवाज दाबला जात आहे. या क्रूर घटनेची जबाबदारी केंद्र सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला टाळता येणार नाही. या प्रकरणी याेगी आदित्‍यनाथ यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा द्‍यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ( दि.13 ) येथे पत्रकार परिषदेत केली.

यावेळी पवार यांनी केंद्र सरकार, सीमेवरील दहशतवाद आणि विविध प्रश्‍नांवर भाष्य केले. ते म्हणाले, जम्मूमध्ये सैनिकांवर हल्ले होत आहेत. नुकतेच काश्‍मीरमध्‍ये पाच जवान शहीद झाले आहेत. काश्‍मीरमधील परिस्‍थिती हाताळण्‍यास केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. चीनसोबत १३ वेळा बैठका घेतल्या. त्यातील एकही अयशस्वी झाली नाही.  सीमाप्रश्‍नी सर्वपक्षीयांबरोबर सरकारने चर्चा करत नाही. यावरुन सरकारची भूमिका स्‍पष्‍ट होते. सीमाप्रश्‍नी सर्वपक्षीयांचे मत जाणून घेणे आवश्‍यक आहे, असेही पवार म्‍हणाले.

नुसती बघ्याची भूमिका लाजिरवाणी

लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडले. लखीमपूर येथील घटनेत केंद्र सरकारच्या गृह राज्‍यमंत्र्याचा मुलगा होता हे शेतकरी सांगतात तरीही ते नाकारले जाते. शेतकऱ्यांची हत्या झाली. सत्ता असली तरीही शेतकऱ्यांसाठी भूमिका घेतली पाहिजे. बघ्याची भूमिका घेणे हे लाजिरवाणे आहे. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी जबाबदारीतून मुक्त व्हावे, असेही आवाहन त्‍यांनी केले.

मावळच्या घटनेला भाजपची चिथावणी

लखीमपूरप्रश्नी राज्यात बंद पुकारल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची तुलना मावळशी केली हाेती. यावर पवार म्‍हणाले,  मावळामध्ये शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला सरकारी पक्षाचे कुठलेही नेते जबाबदार नव्हते. ती कारवाई पोलिसांची होती. माजी मुख्यमंत्र्यांनी लखीमपूर आणि मावळ अशी तुलना केली. मावळमधल्या लोकांना माहीत झालेय की, या घटनेशी लोकप्रतिनिधींचा समावेश नव्हता. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी तेथे गोळीबार केला होता. त्यामुळे बराच अपप्रचार झाला. मावळामध्ये ९० हजार मतांनी राष्ट्रवादीचा आमदार झाला. जर नाराजी असती तर हे चित्र वेगळे असते. मावळातील परिस्थिती समजून घेतली तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल, असा टाेलाही पवारांना लगावला.

तपास यंत्रणांचा गैरवापर

केद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. मुबंईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही आरोप केले.  ते आरोप सार्वजनिकही केले. त्यानंतर ते गायब झाले. अनिल देशमुखांनी आरोपांमुळे राजीनामा दिला. मात्र, परमबीर सिंग हे गायब झाले. देशमुख यांच्या घरावर चार ते पाच वेळा छापे टाकून काय मिळाले, हेही सांगितले पाहिजे. ईडी. सीबीआय, एसीबीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे, असा आराेपही त्‍यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो

मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. कारण त्‍यांना अजूनही मुख्‍यमंत्री असल्‍यासारखच वाटतय. मी राज्‍याचा चारवेळा मुख्‍यमंत्री होतो. मात्र सत्ता गेल्‍यानंतर मला कधीच आपणच मुख्‍यमंत्री आहोत, हे लक्षात राहिले नाही, असा टोलाही त्‍यांनी लगावला.

‘एनसीबी’च्‍या कारवाईवर पवारांचा सवाल

एनसीबीच्या पथकाने २ ऑक्टोबर राेजी एका क्रूझवरील ड्रग्‍ज पार्टीवर छापा टाकला. या कारवाईविषयी नवाब मलिक यांनी मला माहिती दिली. मीही यासंदर्भात माहिती घेतली. तर एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे अधिकारी हवाई दलाच्‍या एक्‍साईज विभागात होते. येथे त्‍यांच्‍याबद्‍दलची माहिती मला मिळाली. मात्र यामधील संपूर्ण माहिती नसल्‍यामुळे मी त्‍यावर बोलणार नाही, असे सांगत पवार म्‍हणाले, या प्रकरणात एनसीबीने नुकतेच ड्रग्‍ज जप्‍त केलेल्‍या कारवाईत पंच म्‍हणून निवड केलेले गोसावी हा व्‍यक्‍ती समोर येत नाही. त्‍यामुळेच सर्व कारवाईबाबत संशय निर्माण होता. गोसावी यांची पंच म्‍हणून निवड केली याचा अर्थच कारवाई करणार्‍या अधिकार्‍याचे या लोकांशी संबंध होते, हे स्‍पष्‍ट होते. तसेच ही कारवाई कोणी करायला सांगितली हेही स्‍पष्‍ट होते, असेही पवार यांनी सांगितले.

मुंबईतील ड्रग्‍ज जप्‍त कारवाईबाबत भाजप नेते खुलासा करत होते. ही जबाबदारी ‘एनसीबी’ची होती. मात्र हे काँट्रॅक्‍ट भाजपने केव्‍हा घेतले, असा टोलाही त्‍यांनी लगावला. या कारवाईचे श्रेय एका केंद्रीय राज्यमंत्र्यानी घेतले. ते म्‍हणाले हे आमचंच काम आहे. मीही सरकारमध्‍ये काम केले आहे. त्‍यामुळे सरकारचे काम कोणते हे सांगत या राज्यमंत्र्यानी आमच्‍या ज्ञानात भरच टाकली. शासकीय यंत्रणांकडून अधिकार्‍यांचा गैरवापर होत आहे. त्‍याचे समर्थन भाजप करत आहे, असेही पवार म्‍हणाले.

केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिस अधिक कार्यक्षम

केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिसांनी जास्‍त ड्रग्‍ज जप्‍त केले आहेत. केंद्रीय यंत्रणांपेक्षा मुंबई पोलिस अधिक कार्यक्षम आहेत. कोणालाही शंका येणार नाही, अशी त्‍यांची कामगिरी आहे, असेही पवार म्‍हणाले.

तिन्‍ही पक्षांच्‍या कार्यकर्त्यांचे धन्‍यवाद

लखीमपूर हिंसाचाराच्‍या निषेधार्थ महाराष्‍ट्रात बंद पाळण्‍यात आला. हा निर्णय महाराष्‍ट्रातील तीन प्रमुख राजकीय पक्षांनी घेतला. हा बंद यशस्‍वी झाला. यासाठी राज्‍यातील जनतेचेही मला आभार मानायचे आहेत. तसेच तिन्‍ही पक्षांच्‍या कार्यकर्त्यांना धन्‍यवाद द्‍यायला हवेत.   शेतकर्‍याच्‍या हत्‍या झाल्‍याची नोंद राज्‍यातला सामान्‍य माणसाने घेतली, हे यावरुन दिसले, असेही पवार म्‍हणाले.

साखर उद्योगाची अवस्‍था कापड उद्‍योगासारखी होऊ नये

यंदा पाऊस चांगला आहे. धरणांमधील पाणीसाठा चांगला आहे. त्‍यामुळे ऊस लागवड वाढणार आहे. यावर्षासह पुढील वर्षीही राज्‍यात ऊस उत्‍पादन विक्रमी होईल. मात्र केंद्र सरकारच्‍या धोरणांचा फटका शेतकर्‍यांसह साखर उद्‍याेगाला  बसत आहे. मुंबईमध्‍ये गिरणी कामगाराचा संप झाला. त्‍यावेळी आम्‍ही सांगत होतो तुटेल एवढे ताणू नये. अखेर मुंबईसह राज्‍यातील कापड उद्‍योगाला याचा मोठा फटका बसला. हा उद्‍योगच जवळपास संपला. आज महाराष्‍ट्राचे ग्रामीण वैभव म्‍हणून साखर उद्‍योगाची ओळख आहे. साखर उद्योगाची अवस्‍था कापड उद्‍योगासारखी होऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे, असेही पवार यांनी नमूद केले.

हेही वाचलं का?

 

Back to top button