Tigers : पैनगंगेच्या खोर्‍यात वाघांचा मुक्तसंचार!  | पुढारी

Tigers : पैनगंगेच्या खोर्‍यात वाघांचा मुक्तसंचार! 

प्रशांत भागवत (उमरखेड) ; पुढारी वृत्तसेवा

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीचे खोरे व पैनगंगा अभयारण्याचा विस्तीर्ण घनदाट परिसरात सध्या वाघांचा मुक्तसंचार (Tigers) मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एरव्ही एक तरी वाघ दिसावा म्हणून हौशी पर्यटक दूरवरच्या व्याघ्रप्रकल्पात दिवसभर भटकंती करतात. मात्र, उमरखेडच्याच पैनगंगा अभयारण्यात चक्क गेल्या सोमवारी  वाघ-वाघिणीचे जोडपे (Tigers) पाहायला मिळाल्याने वनकर्मचारी सजग झाले आहेत.

वाघांना पांढरकवडाच्या टिपेश्वर अभयारण्याचा परिसर भटकंतीसाठी अपुरा पडू लागलाय. त्यांनी गेल्या वर्षभरापासून आपला मोर्चा उमरखेडच्या पैनगंगा अभयारण्याकडे वळविला आहे.

Tigers : दुर्मीळ क्षण कॅमेराबद्ध

किनवट, माहुरच्या जंगलाला लागून असलेल्या खरबी वनपरिक्षेत्रात वनअधिकारी गेले होते. सोमवारी वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर, वन कर्मचारी अश्विन मुजमुले, एस. आर. बोंबले, एस. एल. कानडे, विजय टोंगळे गस्त घालत होते. त्यावेळी एका पाणवठ्याच्या काठावर हे वाघ-वाघिणीचे जोडपे आरामात पहुडलेले आढळले. त्यांनी हा  दुर्मीळ क्षण कॅमेराबद्ध केला.

वाघ-वाघिणीचा हा दुर्मिळ क्षण कॅमेराबध्द करण्यात आला.

अभयारण्यातील हिरवळ, पाणवठ्यांवर हे वाघ मुक्तपणे विहार करीत आहेत. यापूर्वीही असेच एक जोडपे या भागात दिसले होते हे विशेषत: या दोन वाघांसह आणखी एक वाघ पैनगंगा अभयारण्यात आहे. त्यामुळे, खरबीच्या जंगलातमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शेतकरी, मजुरांनी जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी केले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा आणि टिपेश्वर अभयारण्यातील वाघांची दुनिया आता अधिक समृद्ध होत आहे. या अभयारण्यांना व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याची मागणी प्रलंबित आहे. मात्र, वाढलेल्या वाघांचे हे ‘पुरावे’ या प्रलंबित असलेल्या मागणीला पाठबळ देत आहेत.

हेही वाचलं का?

Back to top button