‘अतिक तुझ्या कुटुंबाचे वाटोळे होईल’ : एका विधवेने १८ वर्षांपूर्वी दिलेला शाप खरा ठरला!

‘अतिक तुझ्या कुटुंबाचे वाटोळे होईल’ : एका विधवेने १८ वर्षांपूर्वी दिलेला शाप खरा ठरला!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'अतिक अहमद ज्या पद्धतीने तू माझ्या नवऱ्याचा खून केला, तशाच प्रकारे एक दिवस तुझं कुटुंबही उद्‍ध्‍वस्‍त होईल.', असा शाप १८ वर्षांपूर्वी अतिकला पूजा पाल या महिलेने दिला होता. शाप देणारी ही महिला कोण आहे? तिने हा शाप का दिला होता, अशा सगळ्या घटनांना आता उत्तर प्रदेशात उजाळा दिला जात आहे. ( Atiq Ahmed Murder )

कुख्‍यात गँगस्‍टर अतिक अहमद आणि त्‍याचा भाऊ अश्रफ या दोघांची शनिवारी रात्री उशिरा गोळ्या झाडून हत्‍या करण्‍यात आली. अतिक आणि अश्रफ दोघांना पोलिस वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना झालेला हा गोळीबार टिव्ही चॅनलवर देशाने लाईव्ह पाहिला. तर दोन दिवसांपूर्वीच अतिकचा मुलगा असद पोलिसांच्या इन्काऊंटरमध्ये मारला गेला. तीन दिवसांत अतिकच्या कुटुंबातील तिघांचा अशा प्रकारे अंत झाल्याने प्रयागराजमधील ४० वर्षांपासूनचा माफियाराजही संपले आहे. या सगळ्यांत चर्चेत आलेले एक नाव म्हणजे आमदार पूजा पाल आणि त्यांनी १८ वर्षांपूर्वी दिलेला शाप!

Atiq Ahmed Murder : १८ वर्षांपूर्वी काय घडलं होतं?

२००४ मध्‍ये अतिक अहमदने प्रयागराज येथून लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यामुळे प्रयागराज पश्चिमची विधानसभा जागा रिक्त झाली. या जागेवरील पोटनिवडणुकीत अतिक अहमदने भाऊ अश्रफला मैदानात उतरवले होते; पण या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले राजू पाल विजयी झाले. अतिकच्या कुटुंबातील सदस्यांचा पहिल्यांदाच निवडणुकीत पराभव झाला होता. हा पराभव अतिक अहमदच्या जिव्हारी लागला.

निवडणुकीनंतर काही दिवसांनी राजू पाल यांचा विवाह पूजा हिच्याशी झाला. प्रयागराज पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ अतिक अहमदला कोणत्याही किमतीवर स्वतःच्या ताब्यात हवा होता. अतिकने राजू पाल यांना थेट संपवण्याचाच कट केला. राजू पाल यांच्या खुनाची जबाबदारी अतिकने अश्रफवर सोपवली होती. २५ जानेवारी २००५ला धुमनगंज येथे राजू पाल यांनी घेरून त्यांची हत्या करण्यात आली. राजू पाल यांना पळवून पळवून मारण्यात आले. आमदाराची अशा प्रकारे हत्या झाल्याने उत्तर प्रदेश हादरून गेला.

लग्‍नानंतर केवळ ९ दिवसांतच पूजा झाल्‍या होत्‍या विधवा

हत्येपूर्वी ९ दिवसांपूर्वीच राजू यांचे लग्न झाले होते. पतीच्या मृत्यूने हडबडून गेलेल्या पूजा यांनी त्या वेळीच अतिकच्या कुटुंबाला शाप दिला होता. 'अतिक तुझ्या गुंडांनी माझ्या नवऱ्याचा ज्या प्रकारे खून केला, तीच स्थिती तुझी आणि तुझ्या कुटुंबाची होईल,' असा शाप पूजा यांनी दिला होता.

पतीचा वारसा सांभाळला

राजू पाल यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत बसपने पूजा पाल यांनी तिकीट दिले; पण ही निवडणूक अश्रफ अहमदने जिंकली; पण २००७मध्ये राजू पाल यांच्‍या पूजा यांनी अतिक अहमदचा पराभव केला. २०१२च्या विधानसभा निवडणुकीतही पूजा पाल यांचाच विजय झाला होता. पूजा पाल सध्या समाजवादी पक्षाच्या आमदार आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news