पुढारी ऑनलाईन: दिवसेंदिवस आम आदमी पार्टीचे (आप ) प्रमुख नेत्यांच्या अडचणीत वाढ होत आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia ) यांची आज ( दि. १७ ) ईडी आणि सीबीआय कोठडी संपली. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले. त्यांच्या 'ईडी' कोठडी २९ एप्रिलपर्यंत तर सीबीआय कोठडी २७ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे.
मनीष सिसोदीया यांना सीबीआयने २६ फेब्रुवारीला अटक केली. यावेळीपासून ते तुरूंगात आहेत. दरम्यान त्यांच्या न्यायालयीन कोठडीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आज (दि. १७) मनीष सिसोदिया त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर त्यांना दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले. मात्र कोर्टाने पुन्हा सिसोदीया यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी दोन आठवड्यांची वाढ केली आहे.
मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा 'ईडी' तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन ५ टक्क्यांवरून वाढवून १२ टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे, आदी आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहे. या घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडीने स्पष्ट केले आहे.