विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांवर भाजप नेत्यांची टीका | पुढारी

विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांवर भाजप नेत्यांची टीका

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षीच्या मध्यात होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी एकजूट होण्याचा प्रयत्न चालविला आहे. याचा एक भाग म्हणून संयुक्त जदचे नेते नितीश कुमार यांनी बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राजदचे लालूप्रसाद यादव, तेजस्वी यादव तसेच आप नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे. या भेटीगाठीवर भाजपच्या अनेक नेत्यांनी सडकून टीका केली आहे.

विरोधकांच्या एकजुटीच्या प्रयत्नांवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते व केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात काही पक्ष अडकतात, तेव्हा ते एकत्र येण्याचा प्रयत्न करतात आणि महाआघाडी बनवितात. मात्र ही महाआघाडी नसून महाठग बंधन असते. 2014 आणि 2019 मध्ये असा प्रयोग झाला होता, तथापि त्याचा काही उपयोग झाला नाही. जनता अशा लोकांना बरोबर ओळखते. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधान बनण्याची स्पर्धा चाललेली आहे. तथापि 2024 निवडणुकीत हे पद रिकामे नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

भाजपचे आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी विरोधकांच्या भेटीगाठींवर बोलताना नितीश आणि राहुल गांधी यांच्या भेटीचे छायाचित्र शेअर करीत आणखी कोणा-कोणासमोर नितीश झुकणार आहेत, असा टोला मारला. भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनीही महाआघाडी आघाडी बेकार असून सदर आघाडीने कौरवांची आठवण करुन दिली असल्याची टीका केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button