काँग्रेसचे दूत जाणार मातोश्रीवर, विरोधी ऐक्यासाठी गाठीभेटी; के. सी. वेणुगोपाल घेणार उद्धव ठाकरेंची भेट | पुढारी

काँग्रेसचे दूत जाणार मातोश्रीवर, विरोधी ऐक्यासाठी गाठीभेटी; के. सी. वेणुगोपाल घेणार उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील भाजप सरकारविरोधात समविचारी पक्षांना एकत्र करण्याची मोहीम काँग्रेसने हाती घेतली. यासाठी काँग्रेस नेतृत्वाने देशपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हे लवकरच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

महाविकास आघाडीतील समन्वयासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मंगळवारी रात्री बैठक झाली. यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांबरोबर जशी चर्चा झाली, तशी काँग्रेसच्या नेत्यांसोबत होईल. महाविकास आघाडी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांचं ऐक्य हा आमच्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे राऊत यांनी सांगितले. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल हे मुंबईत येत आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंची वेळ मागितली आहे. पुढील दोन दिवसांत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वतीने वेणुगोपाल हे ‘मातोश्री’वर येऊन चर्चा करतील.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी अलीकडेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती आहे. भाजपविरोधात देशभर प्रादेशिक पक्षांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने आरंभला आहे. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्रातही ठाकरे यांची भेट घेण्याचे ठरले आहे. काँग्रेस अध्यक्षांनंतर पक्ष संघटनेतील महत्त्वाचे नेते मानले जाणारे आणि गांधी परिवाराचे निकटवर्तीय मानले जाणारे वेणुगोपाल हे ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर येणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. वेणुगोपाल हे मंगळवारीच ही भेट घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, अद्याप दोन्हीकडून भेटीची वेळ नक्की करण्यात आलेली नाही. मात्र, लवकरच ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Back to top button