Navapur Railway Station : दोन राज्य चार भाषांमध्ये विभागलेले अनोखे रेल्वे स्टेशन | पुढारी

Navapur Railway Station : दोन राज्य चार भाषांमध्ये विभागलेले अनोखे रेल्वे स्टेशन

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर रेल्वे स्थानक हे एक अद्वितीय रेल्वे स्थानक आहे ज्याचा एक भाग गुजरातच्या तापी जिल्ह्यात आहे आणि दुसरा भाग महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्यात आहे.  गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेला एकत्रितपणे स्पर्श करणारे हे एकमेव रेल्वे स्थानक आहे. नवापूर रेल्वे स्थानकाचे दोन राज्यांत विभाजन होण्यामागे एक कथा आहे, खरे तर हे स्थानक जेव्हा बांधले गेले तेव्हा महाराष्ट्र आणि गुजरातचे विभाजन झाले नव्हते, तर १ मे १९६१ रोजी मुंबई प्रांताचे विभाजन झाले तेव्हा ते दोन राज्यांत विभागले गेले. महाराष्ट्र आणि गुजरात या फाळणीत नवापूर स्टेशन दोन राज्यांमध्ये आले आणि तेव्हापासून त्याची वेगळी ओळख निर्माण झाली. (Navapur Railway Station )

तिकीट खिडकी महाराष्ट्रात,स्टेशन मास्तर गुजरातमध्ये

नवापूर रेल्वे स्थानकावर एक बेंच आहे. या बेंचचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे आणि उरलेला अर्धा भाग हा गुजरातमध्ये आहे. या बाकावर बसलेल्यांना आपण कोणत्या राज्यात बसलो आहोत हे लक्षात घ्यावे लागते. या स्थानकावर एक सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे, जिथे लोक दूरदूरवरून फोटो क्लिक करण्यासाठी येतात. या स्थानकावरील तिकीट खिडकी महाराष्ट्रात येते, तर स्टेशन मास्तर गुजरातमध्ये बसतात.

Navapur Railway Station : तीन प्लॅटफॉर्म आणि चार रेल्वे ट्रॅक

या स्थानकावर चार वेगवेगळ्या भाषांमध्ये घोषणा केली जाते. हिंदी, गुजराती इंग्रजी आणि मराठी या चार भाषांमध्ये ही माहिती लिहिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना समजणे सोपे जाते. नवापूर रेल्वे स्थानकाची एकूण लांबी ८०० मीटर आहे, त्यातील ३०० मीटर महाराष्ट्रात आणि ५०० मीटर गुजरातमध्ये येते. या स्टेशनला तीन प्लॅटफॉर्म आणि चार रेल्वे ट्रॅक आहेत.

हेही वाचा 

Back to top button