‘जय श्रीराम’च्या गजरात मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा सुरू; आज रामलल्लाचे दर्शन आणि योगींसोबत बैठक | पुढारी

‘जय श्रीराम’च्या गजरात मुख्यमंत्र्यांचा अयोध्या दौरा सुरू; आज रामलल्लाचे दर्शन आणि योगींसोबत बैठक

अयोध्या/मुंबई : पुढारी वृत्तसेवा : ‘श्री प्रभू रामचंद्र की जय…’, ‘जय श्री राम…’ असा गजर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांचे विमान मुंबईहून शनिवारी उडाले आणि रात्री 8 च्या सुमारास त्यांचे लखनौ विमानतळावर जोरदार जल्लोषात स्वागत करण्यात आले. रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील अयोध्येत दाखल होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सजली असून ठिकठिकाणी शिवसेनेचे भगवे झेंडे, धनुष्यबाण चिन्ह आणि भगव्या पताकांनी परिसर भगवामय करण्यात आला आहे. अयोध्येत शिवसैनिकांच्या होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागताचे फलक लखनौ विमानतळापासून अयोध्यापर्यंत लागले आहेत.

रविवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत दाखल होतील आणि रामसेतू पार्कपासून राम मंदिरापर्यंत पायी रॅली काढतील. त्यानंतर रामाचे दर्शन, नवीन मंदिराच्या बांधकामाची पाहणी करतील. हनुमान गढीचे दर्शन घेतील. दुपारी लक्ष्मण किल्ल्याला भेट देऊन येथील साधू-संतांचे आशीर्वाद घेणार आहेत. सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर महाआरती करतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत त्यांची बैठक होणार असून, या बैठकीनंतर अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा होईल.

भाजप नेत्यांची कुमक

मुख्यमंत्री शिंदे यांचा अयोध्या दौरा यशस्वी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले विश्वासू सहकारी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय कुटे यांच्याबरोरच भाजप नेते मोहीत कंबोज यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

Back to top button