सिंधुदुर्ग : दुकानवाड येथे सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपले! आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान | पुढारी

सिंधुदुर्ग : दुकानवाड येथे सोसाट्याच्या वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपले! आंबा, काजू पिकांचे मोठे नुकसान

दुकानवाड; पुढारी वृत्तसेवा : हळदीचे नेरूर दुकानवाड पंचक्रोशीत सोसाट्याच्या वार्‍यासह मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. एक तासाहुन अधिक वेळ अवकाळी पावसाच्या गारपिटीने येथील पंचक्रोशीला झोडपुन काढले. ऐन उष्मात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला, पण रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोसाट्याच्या वार्‍यामुळे अनेकांच्या मांगरांची कौले व पत्रे उडुन गेली. काही ठिकाणी आंबा, काजु, सुपारी झाडे मोडुन पडल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.

कुडाळ तालुक्यातील माणगांव खोर्‍यामधील महादेवाचे केरवडे ते शिवापूर पर्यंतच्या भागात शनिवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वार्‍यासह सर्वत्र गारा पडु लागल्या. तासाभरात जोरदार वार्‍यासह पाऊस व गार्‍याचा वर्षाव झाल्याने गार्‍याचा खच पहायला मिळाला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे ऐन रब्बी हंगामात आंबा, काजु, सुपारी झाडाचे मोठे नुकसान झाले. हळदीचे नेरूर येथील कविटकर यांच्या मांगराचे छप्पर उडुन गेली. केरवडे कॉलनी नजीक रामा कुंभार यांच्या घरावर माडाचे झाड पडुन मोठे नुकसान झाले. एकुणच अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे ह्या भागातील शेतकर्‍यांची धावपळ उडाली. आंबा, काजु, रतांबेच्या झाडांखाली आंबा, काजु रतांब्याचा खच पडला होता. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.

नुकसानीचा पंचनामा व्हावा

ऐन रब्बी हंगामात अवकाळी पावसाने दुकानवाड पंचक्रोशीत सोसाट्याच्या वार्‍यासह हजेरी लावत झोडपुन काढले. यामध्ये अनेक मांगर, घरे व झाडांचे नुकसान झाले. या नुकसानीची संबंधित यंत्रणेने वेळीच दखल घेवुन कार्यवाही करावी अशी मागणी येथील ग्रामस्थांमधुन केली जात आहे.

Back to top button