

पुढारी ऑनलाईन डेस्क: दोन दिवसांपूर्वी दिल्लीला ६.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या तीव्र धक्क्यानंतर देशभरातील अनेक राज्यात आज शुक्रवारी (दि.२४) भूकंपाची साखळी पाहायला मिळत आहे. देशातील मणिपूर, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमध्ये आज (दि.२४) १०.३० वा वाजताच्या दरम्यान विविध राज्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरून दिली आहे.
छत्तीसगढमध्ये आज (दि.२४) सकाळी १०.२८ वाजताच्या सुमारास ३.९ रिश्टर भूकंपाचे सौम्य धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू छत्तीसगढमधील अंबिकापूर शहराच्या नैऋत्येला (पश्चिम-दक्षिण) १२ किमी अंतरावर १० किमी होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.
ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात देखील काही प्रमाणात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे. आज शुक्रवारी (दि.२४) सकाळी ८.५२ च्या सुमारास ३.९ रिश्टर स्केल इतक्या सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू मणीपूरमधील मोइरंग शहराच्या आग्नेय दिशेला (पूर्व-दक्षिण) ५१ किमी खोलीवर होता, अशी माहिती आहे.
तसेच याच भागात मणिपूरमधील मोइरांग येथे गुरुवारी (दि.२३) सायंकाळी ६.५१ वाजता देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.८ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू मोइरांग शहराच्या अति आग्नेयला (दक्षिण-पूर्व-दक्षिण) ६७ किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंपविज्ञानासाठी केंद्राने दिली आहे.
दिल्ली एनसीआरमध्ये झालेल्या ६.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्र भूकंपानंतर आज (दि.२४) मध्यप्रदेशमध्ये देखील सकाळी १०.३० च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के (Earthquake in MP) बसले. या भूकंपाची तीव्रता ४ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वाल्हेर शहराच्या २८ किमी पूर्व-दक्षिण भागात, १० किमी खोलीवर असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.