लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांच्यासमोर अखेर उत्तरप्रदेश सरकारने नमते घेतले आहे. राहुल गांधी यांच्यासह प्रियाका गांधी, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित चन्नी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना लखीमपूर येथे जाण्यास परवानगी दिली आहे.
राहुल गांधी यांना लखनौ विमानतळावर रोखण्यात आले. त्यानंतर त्यांना प्रथम जाण्यास मज्जाव केला, मात्र नंतर काही अटींवर त्यांना जाण्यास परवानगी दिली. उत्तर प्रदेश सरकारने तैनात केलेल्या वाहनांतूनच राहुल गांधी यांनी जावे, असे सांगितले मात्र, स्वत:च्या वाहनातूनच प्रवास करू, यावर राहुल गांधी ठाम राहिले.
राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर लखनौ विमानतळावर प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गांधी यांनी लखनौला जाण्याआधी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर ते लखनौ विमानतळावर आल्यानंतर त्यांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या गेस्ट हाऊसमध्ये नेले. तेथे जवळपास पाऊणतास चर्चा केली.
गांधी लखीमपूरला जाण्यावर ठाम राहिले. उत्तर प्रदेशमध्ये जमावबंदी लागू केल्याने आम्ही तिघेजण लखीमपूरला जाणार असल्याचे गांधी यांनी सांगितले. गांधी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. त्यांनी घोषणाबाजीही केली. दरम्यान पोलिसांनी आडकाठी आणल्याने गांधी यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी, छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे धरणे आंदोलनाला बसले. त्यामुळे पोलिसांनी नमते घेत दौऱ्याची परवानगी दिली.
प्रियांका गांधी यांना ३४ तास ताब्यात ठेवल्यानंतर त्यांना काल पोलिसांनी अटक दाखविली. त्यांना सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसवर ताब्यात ठेवले आहे. प्रियांका गांधी यांनी मोदी यांच्यावर थेट टीका करून मला अटक करता मग हल्लेखोर मोकाट का, असा सवाल केला होता. राहुल गांधी लखनौवरून रवाना झाले असून, हा प्रवास जवळपास तीन तासांचा आहे. ते सीतापूर येथे जाणार असून तेथे बहीण प्रियांका यांना भेटून त्यांच्यासोबत लखीमपूर खिरी येथे जाणार आहेत.
तीन दिवसांपासून मोकाट असलेला संशयित आराेपी आशिष मिश्रा याला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. त्याला अटक न केल्याने पोलिस बॅकफूटवर गेले आहेत. विरोधी पक्षांसह शेतकरी नेते त्यांच्या अटकेवरून ठाम आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे दिल्लीत पोहोचले असून ते काही काळच मंत्रालयात थांबले. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.