लखीमपूर : शेतकरी धरणे आंदोलनाला हिंसक वळण ; तिघे ठार | पुढारी

लखीमपूर : शेतकरी धरणे आंदोलनाला हिंसक वळण ; तिघे ठार

लखीमपूर ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील खिरी लखिमपूर येथे हेलिपॅडवर सुरू झालेल्या शेतकरी धरणे आंदोलनाला रविवारी हिंसक वळण लागले. यावेळी अनेक गाड्यांची मोडतोड करण्यात आली. काही गाड्या पेटवण्यात आल्या. या हिंसाचारात तिघे ठार झाले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांचे हेलिकॉप्टर उतरणार असलेल्या हेलिपॅडवर शेतकर्‍यांनी रविवारी सकाळपासून कब्जा केला होता. दुपारी पावणेतीन वाजता दोन्ही नेत्यांचा काफिला तिकोनिया चौकातून गेला तेव्हा शेतकरी काळे झेंडे घेऊन त्यांच्या दिशेने धावून आले.

यादरम्यान अजय मिश्रा यांचा मुलगा अभिषेक मिश्रा ऊर्फ मोनू याने आपली गाडी शेतकर्‍यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकर्‍यांच्या संतापाचा कडेलोट झाला. शेतकर्‍यांनी मोनू यांच्या गाडीसह अनेक गाड्यांची जाळपोळ, तोडफोड सुरू केली.

पोलिसांनी संतप्त शेतकर्‍यांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या एकूणच घटनाक्रमात 3 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. 8 शेतकरी जखमी झालेले आहेत, असा दावा भारतीय किसान युनियनने केला आहे. संयुक्त किसान मोर्चाचे एक नेते तजिंदरसिंग विर्कही गंभीर जखमी आहेत.

तथापि, प्रशासन अगर पोलिसांकडून त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. प्रशासनाला अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्र्यांना गावाबाहेर सुरक्षितपणे काढण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागले. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत गाझीपूर सीमेवरून लखिमपूर खिरीसाठी रवाना झाले आहेत.

प्रशासनाकडून आधीच अ‍ॅलर्ट

वास्तविक, हेलिपॅडला शेतकर्‍यांनी घेराव घातल्याची माहिती मिळताच अजय मिश्रा आणि उपमुख्यमंत्री केशव मौर्य लखनौहून रस्त्याच्या मार्गाने लखिमपूर जिल्हा मुख्यालयात दाखल झाले होते. योजनांच्या लोकार्पणानंतर त्यांना गावात कुस्तीच्या दंगलीचा प्रारंभ करण्यासाठी जायचे होते. मिश्रा यांचे हे मूळ गाव आहे. प्रशासनाने बनवारी गावालगतच्या तणावपूर्ण परिस्थितीची त्यांना आधीच कल्पना दिली होती.

अजय मिश्रांच्या वक्तव्यावर संताप

अजय मिश्रा यांनी महिनाभरापूर्वी शेतकरी आंदोलनासंदर्भात आम्ही जर मनमानीवर आलो आणि ठरवूनच टाकले तर काहीही घडू शकते, असा इशारा शेतकर्‍यांना दिला होता. त्याविरोधातच शेतकर्‍यांनी त्यांना रविवारी काळे झेंडे दाखविले. घटनेनंतर संयुक्त किसान मोर्चाने सर्व जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

* उपमुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे

* खासदाराच्या मुलाने गर्दीत गाडी घुसवली

Back to top button