तुम्‍ही 'नाटू नाटू'ला ऑस्‍कर मिळाल्‍याचे श्रेय घेऊ नये : राज्‍यसभेत खर्गेंची टोलेबाजी | पुढारी

तुम्‍ही 'नाटू नाटू'ला ऑस्‍कर मिळाल्‍याचे श्रेय घेऊ नये : राज्‍यसभेत खर्गेंची टोलेबाजी

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा- भारतीय लघूपट ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ आणि RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला. देशभरातून ऑस्‍कर पुरस्‍कार विजेत्‍यांवर शुभेच्‍छांचा वर्षाव होत आहे. आज (दि. १४) राज्‍यसभेत ऑस्‍कर विजेत्‍यांचे अभिनंदन करण्‍यात आले. यावेळी काँग्रेसच्‍या मल्‍लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी घेत केंद्र सरकारवर टोलेबाजी केली.

यावेळी खर्गे म्‍हणाले की, ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ आणि RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्‍कर पुरस्‍कार मिळाल्‍याचा आम्‍हाला अभिमान आहे. मात्र, याचे श्रेय केंद्र सरकारने घेऊ नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले नाही. माझी एकच विनंती आहे की, याचे श्रेय पंतप्रधान नरेद मोदी यांनी घेऊ नये.”. खर्गे यांच्‍या टोलेबाजीवर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासह विरोधी पक्षांच्या सर्व नेत्‍यांमध्‍ये हंशा पिकला.

मी वकील नसतो तर नक्‍कीच अभियन केला असता…

यावेळी ‘एमडीएमके’चे खासदार वायको यांनी आपल्‍या भाषणात संगीतकार ए.आर. रहमान यांचा उल्लेख केला. राज्‍यसभा सभापती धनखड यांनी त्यांना ‘जय हो’ असे म्हटले. यावेळी धनखड हसत म्हणाले की, “मी वकील नसतो तर कुठेतरी नक्कीच अभिनय केला असता.” त्‍यांच्‍या या विधानाने सभागृहात एकच हंशा पिकला.

आपण सर्व भारतीय : जया बच्‍चन

यावेळी समाजवादी पार्टीच्‍या खासदार जया बच्चन म्‍हणाल्‍या की, ” भारतीयांना ऑस्‍कर पुरस्‍कार मिळाल्‍याबद्‍दल आम्ही आनंदी आहोत. पुरस्कार विजेते देशातील पूर्व, दक्षिण, पश्चिम किंवा उत्तरेतील आहेत याने काहीच फरक पडत नाही. आपण सर्व भारतीय आहोत. सत्यजित रे यांच्यापासून अनेक वेळा चित्रपट जगताने देशाचे नेतृत्व केले याचा आम्हाला आनंद आहे.”

हेही वाचा : 

 

 

Back to top button