wholesale price index | सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, घाऊक महागाई ३.८५ टक्क्यांवर | पुढारी

wholesale price index | सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यपदार्थांच्या किमतीत घट, घाऊक महागाई ३.८५ टक्क्यांवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील घाऊक किंमत निर्देशांक (wholesale price index) आधारित महागाईत घट होऊन ती २५ महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर आली आहे. देशातील घाऊक किंमत निर्देशांक जानेवारीच्या ४.७३ टक्क्यांच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये ३.८५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मंगळवारी वाणिज्य मंत्रालयाकडून याबाबतची आकडेवारी जारी करण्यात आली.

“कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नॉन फूड वस्तू, अन्न पदार्थ, खनिजे, संगणक, इलेक्ट्रॉनिक आणि ऑप्टिकल उत्पादने, रसायने आणि रासायनिक उत्पादने, विद्युत उपकरणे आणि मोटार वाहने, ट्रेलर आणि सेमीट्रेलर्स यांच्या दरातील घसरणीमुळे फेब्रुवारी २०२३ मधील महागाई दर कमी झाला आहे,” असे प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

सध्याचा घाऊक किंमत निर्देशांक हा कॉर्पोरेट्ससाठी अनुकूल असू शकतो. कारण घाऊक किमतीत घट झाल्यामुळे कॉर्पोरेट कमाईवरील दबाव कमी होऊ शकतो. WPI अन्न निर्देशांकावर आधारित महागाई दर जानेवारी २०२३ मधील २.९५ टक्क्यांवरून फेब्रुवारी २०२३ मध्ये २.७६ टक्क्यांवर आला आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यात क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, खाद्यपदार्थ, धातू आणि रासायनिक उत्पादनांच्या वाढत्या किमतींमुळे घाऊक किंमत निर्देशांक १५.८८ टक्क्यांनी वाढला होता. हा सप्टेंबर १९९१ नंतरचा उच्चांक होता. त्यानंतर अन्नपदार्थांसह अन्य वस्तूंच्या किमतीत घट झाल्याने जानेवारीमध्ये घाऊक किंमत निर्देशांक २४ महिन्यांच्या निच्चांकावर म्हणजे ४.७३ टक्क्यांवर आला होता. आता तो ३.८५ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

अन्न पदार्थ, खनिज तेले, कच्चे पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अन्न उत्पादने, वस्त्रे आणि रसायने तसेच रासायनिक उत्पादने यांच्या किंमतीत घट झाल्याने अखिल भारतीय घाऊक किंमत निर्देशांकावर (wholesale price index) आधारित महागाईचा वार्षिक दर डिसेंबर २०२१ च्या तुलनेत डिसेंबर २०२२ या महिन्यात ४.९५ टक्के इतका राहिला होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये हा दर ५.८५ टक्के इतका नोंदवला गेला होता.

हे ही वाचा :

Back to top button