‘त्या’ व्हिडिओचे मॉर्फिंग झाले आहे का ?: संजय राऊतांची शीतल म्हात्रेंच्या आरोपावर प्रतिक्रिया | पुढारी

'त्या' व्हिडिओचे मॉर्फिंग झाले आहे का ?: संजय राऊतांची शीतल म्हात्रेंच्या आरोपावर प्रतिक्रिया

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यभरात व्हायरल झालेल्या शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा व्हिडिओ खरा आहे की खोटा? त्यामध्ये मॉर्फिंग झाले आहे का ?, हे तपासण्याची गरज असल्याचे मत खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी (दि.१४) पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ठाकरे गटाने हा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला होता. परंतु, राऊत यांनी त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

‘व्हायरल व्हिडिओत जे आमदार आहेत, त्यांनी पोलिसांत काही तक्रार केली आहे का, हे बघितले पाहिजे. त्या पुरूष आमदाराचीही बदनामी झाली आहे. पुरूषाची बदनामी होत नाही का? मिंधे गटाच्या ज्या कुणी महिला नेत्या आहेत, त्या म्हणतात की, व्हिडिओमुळे माझी बदनामी होत आहे. त्यावरुन खटले दाखल होवू शकतात. परंतु, हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला आहे, लाखो लोकांनी पाहिला आहे. मग सर्वांना अटक करणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मिंधे गट आता मुल पळवायला लागली

मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते. आता मुल पळवायला लागले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांनी ही टोलेबाजी केली. मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरु आहे, ती कुचकामी आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.

भाजपच्या वाशिंग मशीनची कमाल

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाई यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले होते. परंतु, त्यांनी आता भूषण यांना भाजपच्या वाशिंग मशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसवले आहे. ही भाजपच्या वाशिंग मशीनची कमाल आहे. मग उदय सामंत यांच्या आरोपांचे काय, असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

हेही वाचा 

Back to top button