H3N2 Influenza: H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढला; गुजरातेत आणखी एकाचा मृत्यू | पुढारी

H3N2 Influenza: H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूचा धोका वाढला; गुजरातेत आणखी एकाचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन: देशातील एच३एन २ इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे. या विषाणुमुळे मृत्यू झाल्याचे देशातील आणखी एक प्रकरण नोंदवण्यात आले आहे. गुजरातमधील वडोदरा येथे H3N2 इन्फ्लूएंझा विषाणूमुळे एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या महिलेवर वडोदरातील SSG रूग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

H3N2 मुळे देशातील पहिला मृत्यू कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील 82 वर्षीय व्यक्तीचा होता. H3N2 विषाणूमुळे आत्तापर्यंत देशात सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पंजाब, हरियाणा आणि कर्नाटक आणि गुजरातमध्ये हे मृत्यू झाले आहेत. यानंतर शुक्रवारी (दि.११) आरोग्य मंत्रालयाने शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, २ जानेवारी ते ५ मार्चपर्यंत देशात H3N2 विषाणूची ४५२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. या महिन्याच्या शेवटी H3N2 प्रकरणांमध्ये घट होण्याची शक्यता असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

मास्क वापरण्याचे निती आयोगाचे आवाहन

H3N2 संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता, नीती आयोगाने कोरोना टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक बोलावली होती. दरम्यान कोरोना नियमांचे पालन करीत मास्क वापरण्याचा सल्ला केंद्राने राज्यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरसा साठा सुनिश्चित करण्याचा, रुग्णांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

एच ३ एन २ विषाणू म्हणजे काय?

सिव्हिअर क्यूट रेस्पेरिटरी इन्फेक्शनने पीडित निम्म्यावर रुग्णांमध्ये एच ३ एन २ विषाणू आढळत असल्याचे दस्तुरखुद्द भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटलेले आहे. एच ३ एन २ विषाणूला एन्फ्लुएन्झा ए विषाणू म्हणूनही ओळखले जाते. खरे तर एच ३ एन २ हा एन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा उपप्रकार आहे. १९६८ मध्ये पहिल्यांदा त्याचा शोध वैद्यकशास्त्राला लागला. विशेषत:, वातावरणातील बदलाच्या काळात श्वसन यंत्रणेशी निगडित व्हायरल इन्फेक्शनला तो दरवर्षी कारणीभूत ठरतो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, या विषाणूच्या इन्फेक्शननंतर तीन आठवडे खोकला जात नाही. रक्त नमुन्यांसह काही अन्य तपासण्यांअंतीच एच ३ एच २ ची लागण झाल्याचे कळू शकते.

एच ३ एन २ ची लक्षणे काय?

सतत खोकला, ३ ते ५ दिवस ताप, थंडी वाजून येणे, धाप लागणे आणि घसा खवखवणे अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात. रुग्णांमध्ये मळमळ, अंगदुखी आणि अतिसाराचीदेखील लक्षणे नोंद करण्यात आली आहेत. ही लक्षणे सुमारे एक आठवडा जाणवतात. खोकला ३ आठवड्यांपर्यंत राहू शकतो. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून तो खोकला, शिंकणे आणि संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून पसरतो, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

Back to top button