H3N2 विषाणूचा धोका वाढला, देशात ६ जणांचा मृत्यू, जाणून घ्या त्याची लक्षणे | पुढारी

H3N2 विषाणूचा धोका वाढला, देशात ६ जणांचा मृत्यू, जाणून घ्या त्याची लक्षणे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : देशात एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाचा (विषाणूज्वर) धोका वाढला आहे. आतापर्यंत एच ३ एन २ इन्फ्लुएन्झामुळे ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब, हरियाणा आणि कर्नाटकमध्ये हे मृत्यू झाले आहेत. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील या रुग्णाला ताप, घसादुखी आणि खोकल्याचा त्रास होता, असे राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. या विषाणूमुळे (H3N2 virus) मृत्यू ओढविल्याचे प्रकार पहिल्यांदाच समोर आले आहेत. दोन महिन्यांपासून देशभरात या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश जारी केले आहेत. शनिवारी यासंदर्भात नीती आयोगाची बैठक होणार आहे.

हरियाणातील रुग्णाबाबत अद्याप संपूर्ण तपशील हाती आलेला नाही; मात्र कर्नाटकमधील रुग्णाबाबतची माहिती प्राप्त झाली आहे. हिरा गौडा (वय ८२) असे मृताचे नाव असून, ते १ मार्च रोजी मरण पावले. मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा त्रासही त्यांना होता. तपासणीदरम्यान घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल ६ मार्च रोजी प्राप्त झाला. त्यानुसार हिरा यांना एच ३ एन २ इन्फ्लुएन्झाची लागण झाली होती, ही बाब समोर आली.

६७ दिवसांनंतर कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्याही पहिल्यांदाच ३ हजारांवर गेली आहे. केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात एच ३ एन २ विषाणूच्या रुग्णसंख्येतील वाढ आरोग्य विभागाचा ताण वाढविणारी आहे. एच ३ एन २ची लागण झालेले ९० रुग्ण आजवर देशभरात नोंदविले गेले आहेत. प्रत्यक्षात ही संख्या किती तरी जास्त असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी शुक्रवारी एच ३ एन २ विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात तातडीची बैठक बोलावली. बैठकीनंतर सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीत एच ३ एन २ तसेच मौसमी इन्फ्लुएन्झाबाबत धोरण ठरवले जाईल.

एच ३ एन २ विषाणू म्हणजे काय?

सिव्हिअर क्यूट रेस्पेरिटरी इन्फेक्शनने पीडित निम्म्यावर रुग्णांमध्ये एच ३ एन २ विषाणू आढळत असल्याचे दस्तुरखुद्द भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटलेले आहे. एच ३ एन २ विषाणूला एन्फ्लुएन्झा ए विषाणू म्हणूनही ओळखले जाते. खरे तर एच ३ एन २ हा एन्फ्लुएन्झा ए या विषाणूचा उपप्रकार आहे. १९६८ मध्ये पहिल्यांदा त्याचा शोध वैद्यकशास्त्राला लागला. विशेषत:, वातावरणातील बदलाच्या काळात श्वसन यंत्रणेशी निगडित व्हायरल इन्फेक्शनला तो दरवर्षी कारणीभूत ठरतो. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मते, या विषाणूच्या इन्फेक्शननंतर तीन आठवडे खोकला जात नाही. रक्त नमुन्यांसह काही अन्य तपासण्यांअंतीच एच ३ एच २ ची लागण झाल्याचे कळू शकते.

लक्षणे काय?

सतत खोकला, ३ ते ५ दिवस ताप, थंडी वाजून येणे, धाप लागणे आणि घसा खवखवणे अशी प्रमुख लक्षणे दिसून येतात. रुग्णांमध्ये मळमळ, अंगदुखी आणि अतिसाराचीदेखील लक्षणे नोंद करण्यात आली आहेत. ही लक्षणे सुमारे एक आठवडा जाणवतात. खोकला ३ आठवड्यांपर्यंत राहू शकतो. हा विषाणू अत्यंत संसर्गजन्य असून तो खोकला, शिंकणे आणि संक्रमित व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातून पसरतो, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

हाँगकाँग फ्लू

भारतात फ्लूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे, ज्याचा संबंध H3N2 विषाणूशी आहे. ज्याला ‘हाँगकाँग फ्लू’ (Hong Kong flu) असेही म्हटले जाते. गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील रुग्णालयांत असे रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. H3N2 virus हा इन्फ्लूएंझा विषाणूचा एक प्रकार आहे ज्याला इन्फ्लूएंझा ए व्हायरस म्हणतात. हा एक श्वसनाशी संबंधित विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्याचा प्रार्दुभाव दरवर्षी होतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले आहे की H3N2 विषाणूच्या संसर्गामुळे त्याच्या उपप्रकारांपेक्षा रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. H3N2 फ्लूमध्ये कोविड सारखीच लक्षणे दिसतात.

 हे ही वाचा :

Back to top button