H3N2 Influenza : मास्क वापरा, निती आयोगाचे आवाहन; इन्फ्लूएंझाच्या संसर्गाने वाढवली चिंता | पुढारी

H3N2 Influenza : मास्क वापरा, निती आयोगाचे आवाहन; इन्फ्लूएंझाच्या संसर्गाने वाढवली चिंता

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशातील एच३एन२ इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गाने चिंता वाढवली आहे.अशात गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन शनिवारी नीती आयोगाकडून करण्यात आले आहे. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता नीती आयोगाने कोरोना टास्क फोर्स, केंद्रीय आरोग्य सचिव, सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक बोलावली होती.दरम्यान कोरोना नियमांचे पालन करीत मास्क वापरण्याचा सल्ला केंद्राने राज्यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. राज्यांनी आवश्यक औषधांचा पुरसा साठा सुनिश्चित करण्याचा, रुग्णांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. (H3N2 Influenza)

बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांचे मुख्य सचिव, प्रमुख सचिव, आरोग्य सचिवांना संसर्गाचा वाढत्या प्रभावासंदर्भात माहिती देणारे पत्र लिहले आहे.देशातील काही राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये संसर्ग तसेच तीव्र श्वसनासंबंधी संसर्गासारख्या इतर इन्फ्लूएंझा चे वाढते प्रमाण लक्षात घेता नीती आयोगाचे सदस्य आरोग्य, नीती आयोग आणि आरोग्य विभागाचे अधिकारी यांच्यासोबत एक आढावा बैठक घेण्यात आली.सर्व संबंधित केंद्रीय मंत्रालये, विभाग तसेच संघटनांसोबत बैठकीतून विद्यामान स्थितीचा आढावा घेण्यात आल्याची माहिती पत्रातून भूषण यांनी दिली आहे. (H3N2 Influenza)

इन्फ्लूएंझा एक वार्षिक वातावरणीय बदल आहे. सध्यस्थितीत वातावरणात विविध प्रकारची वातावरणीय स्थिती तसेच व्यवहार संबंधित कारण जसे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, इतर लोकांजवळ पर्याप्त सुरक्षा नसतांना शिंकने तसेच खोकलने, इनडोर सभा इन्फ्लूएंझा ए (एच१एच१, एच३एन२, एडनोव्हायसर) सारख्या अनेक संसर्गजन्य श्वसन रोगासाठी वातावरण अनुकूल बनवत आहे, अशी चिंता पत्रातून भूषण यांनी व्यक्त केली. (H3N2 Influenza)

एकीकृत रोग देखरेख कार्यक्रमाअंतर्गत (आयडीएपी) राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या माहितीनूसार देशात या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. डिसेंबर २०२२ नंतर इन्फ्लूएंझा ए मध्ये वाढ दिसून येत आहे.विविध प्रयोगशाळांमध्ये अभ्यास केल्यानंतर लहान मुल, वृद्ध तसेच सहरुग्णांना एच१एन१, एच३एन२ तसेच एडनोव्हायरस ची लागण होण्याची जोखीम जास्त असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा वेग मंदावला होता.पंरतु, काही राज्यात कोरोना संसर्गदरातील वृद्धी चिंताजनक आहे, यावर तात्कळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.टेस्ट-टॅक्र-उपचार-लसीकरण या धोरणावर पाच पटीने अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन भूषण यांनी राज्यांना केले आहे. १ जानेवारी २०२३ पासून आयसीएमआरने प्रयोशाळांमध्ये केलेल्या नमुना परिक्षणात २५.४% नमुन्यांमध्ये एडनोव्हायरस आढळला असल्याचे भूषण म्हणाले.


अधिक वाचा : 

Back to top button