हैदराबाद, वृत्तसंस्था : वधुपित्याकडून अपेक्षेनुसार हुंडा मिळाला नाही तर लग्न मोडणारे नवरोबा अनेक आहेत, पण आदिवासी समाजातील तरुणीने " लग्नात हुंडा कमी मिळाला म्हणून लग्न मोडल्याची घटना घडली आहे. (Dowry)
आदिवासी समाजात वरपक्षाकडून वधूपक्षाला हुंडा दिला जातो. त्यानुसार एका आदिवासी तरुणीने दोन लाख रुपये हुंडा वरपक्षाकडून आला, परंतु तिने यापेक्षा जास्त हुंड्याची मागणी केली. ती पूर्ण करण्यास वरपक्षाकडून नकार येताच तिने चक्क लग्न मोडले. या तरुणीचे लग्न गुरुवारी हैदराबादच्या घटकेसर भागात होणार होते. ठरल्याप्रमाणे भद्रारी कोठागुडम तालुक्यातील अस्वरावपेट गावातून वऱ्हाडी तरुणीला घेऊन आले. लग्नमंडप सजला, वऱ्हाडी जमले आणि लग्नघटिकेची आतुरतेने वाट पाहू लागले, पण अचानक हे लग्न रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली, कारण वऱ्हाडी जेथे थांबले होते, त्या हॉटेलमधून वधू लग्नमंडपात पोहोचलीच नाही.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही पक्षांतील जाणत्या मंडळींनी आपसात चर्चा केली आणि लग्न मोडल्याचे जाहीर केले. या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही, त्यामुळे गुन्हाही नोंदविण्यात आलेला नाही. मुलगी लग्नाला तयार नव्हती, म्हणून कदाचित तिने जादा हुंड्याची मागणी केली असावी, असे हा अधिकारी म्हणाला. वरपक्षाने हुंड्यापोटी दिलेले दोन लाख रुपये वधुपक्षाने परत केले आणि दोन्ही वऱ्हाडांनी आपापली वाट धरली, अशी माहितीही त्याने दिली.
वरपक्षाच्या मंडळींनी थेट वधू जेथे थांबली होती त्या हॉटेलकडे धाव घेतली आणि मुलगी लग्नमंडपात का आली नाही, अशी विचारणा केली. त्यावर मुलीने जास्त हुंडा मागितला आहे, असे त्यांना सांगण्यात आले. या माहितीमुळे हादरून गेलेल्या वरपक्षाकडील मंडळीने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी वधुपक्षाकडील मंडळींना बोलावून त्यांची समजूत घातली, परंतु वधुपक्षाकडील वऱ्हाडी काहीही ऐकण्यास तयार नव्हते.
हेही वाचा