Marriage : लग्नासाठी महाराष्ट्रातील गरीब मुलींचे अपहरण; गुजरात, राजस्थानमध्ये लाखात सौदा | पुढारी

Marriage : लग्नासाठी महाराष्ट्रातील गरीब मुलींचे अपहरण; गुजरात, राजस्थानमध्ये लाखात सौदा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शेजारच्या गुजरात, राजस्थान राज्यात लग्नासाठी महाराष्ट्रातून गरीब आणि अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांचा काही लाखांत सौदा केला जातो. यावर्षी अशा २४ गुन्ह्यांची नोंद झाल्याची लेखी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. (Marriage)

राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार महादेव जानकर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न विचारला होता. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या भागांतून गरीब मुलींचा राजस्थान, गुजरातमधील गावांमध्ये लग्नासाठी सौदा होत असल्याचा मुद्दा जानकर यांनी उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, २०२१ मध्ये महिलांचे विवाहासाठी अपहरण केल्याप्रकरणी ४०५ गुन्हे नोंद होते. विवाहासाठी ४१८ महिलांचे अपहरण झाले होते. त्यामध्ये ३६३ अल्पवयीन मुलींचा समावेश आहे, तर या गुन्ह्यांमध्ये ४४८ आरोपींना अटक झाली होती.
२०२३ मध्ये राज्यात विवाहासाठी अपहरणाचे २४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यातून गरीब व अल्पवयीन मुलींची राजस्थान व गुजरात राज्याच्या काही गावांमध्ये विवाहासाठी एक ते दोन लाख रुपयांमध्ये सौदा केला जातो, हे अंशत: खरे असल्याचेही फडणवीस यांनी आपल्या उत्तरात सांगितले.

Marriage : ऑपरेशन मुस्कान आणि रियुनाइट

दरम्यान, मुंबईतील बेपत्ता मुलींच्या तपासाबाबतचा प्रश्न ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस आणि सुनील शिंदे यांनी उपस्थित केला होता. त्यावर, मुंबईतून २०२२ मध्ये १ हजार ३३० अल्पवयीन मुली बेपत्ता होत्या, पैकी १ हजार ९७ मुली सापडल्याचे लेखी उत्तर गृहमंत्र्यांनी दिले. १८ वर्षांवरच्या ४ हजार ४३७ महिला हरवल्याची नोंद वर्ष २०२२ मध्ये झाली होती. यापैकी ३ हजार ३९ महिला सापडल्या आहेत, असे गृहमंत्री फडणवीस यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे. हरवलेली मुले, मुली शोधण्यासाठी ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन रियुनाइट राबवण्यात येत असल्याचे गृहमंत्र्यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे.

  • मुंबईत गेल्या वर्षी एकूण १ हजार १५५ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. याप्रकरणी दाखल झालेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांपैकी १ हजार ३९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे, तर गेल्यावर्षी ९ तरुणी, महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे.
  • २०२२ दाखल गुन्हे – १,१५५ उकल – १,०३९
  • २०२१ दाखल गुन्हे – १,०९३ उकल – ९४२

हेही वाचा 

Back to top button