कोचीमध्ये लॉकडाऊन? कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती; लहान मुले, वृद्ध लोक घरात कैद; जाणून घ्या कारण | पुढारी

कोचीमध्ये लॉकडाऊन? कोरोनापेक्षा भयानक परिस्थिती; लहान मुले, वृद्ध लोक घरात कैद; जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील कोची शहरात सध्या लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. येथे फार कमी लोक रस्त्यावर फिरत आहेत. घराबाहेर पडताना लोकांच्या चेहऱ्यावर मास्कही दिसतो. लहान मुले आणि वृद्ध लोक तर पूर्णपणे घरात कैद झाले आहेत. हे सर्व कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नाही तर येथील कच-याच्या डम्पिंग यार्डला लागलेल्या आगीमुळे आहे. आठवडाभरापूर्वी ब्रह्मपुरम परिसरातील एका डंपिंग यार्डमध्ये आग लागली होती, ज्याचा विषारी धूर संपूर्ण परिसरात पसरला होता. आठ दिवसांहून अधिक काळ लोटला तरी लोकांना यापासून दिलासा मिळालेला नाही. विषारी धुरामुळे लोकांना डोळ्यात आणि घशात जळजळ होण्याबरोबरच श्वास घेण्यास त्रास होत आहे.

लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

ब्रह्मपुरम आणि आजूबाजूच्या परिसरातील विषारी हवेमुळे केरळ सरकारने रहिवाशांना घरातच राहण्याचे आणि खिडक्या-दरवाजे उघडे न ठेवण्याचे आवाहन केले आहे. विषारी धुरामुळे कॅन्सरसारखे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. आग विझवण्यासाठी २०० फायर इंजिन कार्यरत आहेत. सुमारे ५० हजार टन कचऱ्याला आग लागली आहे. ज्या भागात प्लास्टिकचा कचरा पसरला आहे, त्यातील ७० टक्के भाग विझवण्यात आला आहे, तर उर्वरित ३० टक्के भागात धुरावर नियंत्रण ठेवण्याचे काम सुरू आहे, असे अग्निशमन विभागाने सांगितले.

शाळा, महाविद्यालये बंद

आग विझवण्याच्या कामात मदत करण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून Mi १७ हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोची आणि शेजारील एर्नाकुलम जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. डीएमओ कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. केरळ सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लोकांना घराबाहेर जॉगिंग आणि व्यायाम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच बाहेर पडताना N95 मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button