Crude oil rates discount : क्रूड ऑईल दरात डिस्काऊंटसह इराक आता भारताच्या दारात | पुढारी

Crude oil rates discount : क्रूड ऑईल दरात डिस्काऊंटसह इराक आता भारताच्या दारात

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : युद्धनीतीमध्ये व्यूहरचना यथायोग्य असली की, अवघड वाटणारे युद्धही जिंकता येते, असा आदर्श सध्या भारताने जागतिक क्रूड ऑईलच्या बाजारामोर घालून दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंंत्री एस. जयशंकर यांनी जागतिक क्रूड ऑईलच्या बाजारात उत्पादक कंपन्यांइतकेच महत्त्व खरेदीदार ग्राहक देशालाही आहे, असे पटवून देण्यासाठी योग्य खेळ्या खेळल्या. यामुळे जागतिक क्रूड ऑईलच्या बाजाराला सेलर्स मार्केटऐवजी बायर्स मार्केट असे स्वरूप आले आहे. याचाच एक भाग म्हणून काही क्रूड उत्पादक राष्ट्रांनी आता भारताला तेल खरेदी करण्यासाठी मजबूत डिस्काऊंटची ऑफर तर दिलीच. शिवाय भारताला पटविण्यासाठी त्यांच्या दिल्ली वार्‍याही सुरू झाल्या आहेत.

जागतिक क्रूड ऑईलच्या बाजाराची सूत्रे काही मर्यादित देशांकडे आहेत. या देशांच्या समूहाने (ओपेक) तेलाचा दर निश्चित केला की, गप्पगुमान त्या भावात तेल खरेदी करण्याची अपरिहार्यता ग्राहक देशांकडे होती. कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर देशापुढे रशिया-युक्रेन युद्धाचे नवे संकट उभे राहिले. या संकटामध्ये क्रूड ऑईलचा जागतिक बाजारातील भाव 110 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत जाऊन थडकला. यामुळे साहजिकच जगातील विशेषतः विकसनशील आणि गरीब राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन अर्थव्यवस्था टिकतील की नाहीत, अशी अवस्था झाली होती. याच पार्श्वभूमीवर युक्रेनच्या बाजूने उभ्या राहिलेल्या युरोपीय राष्ट्रांनी रशियावर बहिष्काराचे तंत्र अवलंबल्यानंतर ही परिस्थिती आणखी कठीण बनली होती. तथापि, एका बाजूला रशियाचा हात घट्ट पकडून भारताने मानवाधिकाराला प्राधान्य आणि पर्यायाने अन्य महासत्तांना न दुखविण्याची दक्षता घेतली. या खेळीत रशियाकडून स्वस्त तेही रुपयाच्या चलनामध्ये तेल उपलब्ध करून घेतल्यामुळे जागतिक क्रूड ऑईलच्या बाजाराचा सारीपाटच बदलला आहे.

भारत हा जगातील क्रूड ऑईलचा सर्वाधिक वापर करणारा तिसर्‍या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. भारत क्रूड ऑईलच्या एकूण वार्षिक खरेदीपैकी 73.02 टक्के इंधन जगातील इराक, सौदी अरेबिया, रशिया, युनायटेड अरब अमिरात आणि अमेरिका या पाच राष्ट्रांकडून आयात करतो. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने रशियाकडून अवघ्या 2.2 बिलियन डॉलर्सची आयात केली होती. मात्र, जागतिक अर्थकारणाला कलाटणी मिळाल्यानंतर 2022-23 या आर्थिक वर्षात एप्रिल ते जानेवारीअखेर भारताची रशियाकडून होणारी क्रूड ऑईलची आयात 10 पटीने म्हणजे 21.8 बिलियन डॉलर्सवर गेली आहे. याचा फटका सौदी अरेबिया, इराक या पुरवठादार देशांना बसला आहे.

भारताच्या मिनतवार्‍या

पश्चिम आशियाई राष्ट्रांकडून तुलनात्मक आयात घसरल्याने खडबडून जागे झालेल्या इराकने आपला मोठा ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी भारताला मिनतवार्‍या करण्यास सुरुवात केली आहे. रशियाकडून 33 टक्के क्रूड ऑईलची सातत्याने खरेदी करणार्‍या भारताला परावृत्त करण्यासाठी इराकने भारतीय तेल उत्पादक कंपन्यांकडे संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. या संपर्कामध्ये क्रूड ऑईलच्या दरामध्ये किती डिस्काऊंट ऑफर करावा लागेल, अशी विचारणा भारतीय तेल कंपन्यांकडे इराकच्या प्रतिनिधींनी करावयास सुरुवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नजीकच्या काळात इराकचे प्रतिनिधी भारतीय तेल कंपन्यांच्या भेटीला येणार असल्याचे समजते. या बदललेल्या चित्राने भारताने अत्यंतकुशाग्र बुद्धीने खेळलेली चाल यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button