निर्मला सीतारामन यांच्या ‘ओल्ड पाॅलिटिकल‘ विधानावर पिकली खसखस | पुढारी

निर्मला सीतारामन यांच्या ‘ओल्ड पाॅलिटिकल‘ विधानावर पिकली खसखस

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : अर्थसंकल्पीय भाषणावेळी ‘अमृत धरोहर‘ मध्ये नेमके काय काय केले जाणार, याची चर्चा करताना निर्मला सीतारामन सांगू लागल्या की, जुनी प्रदूषण करणारी वाहने हटविली जातील. मात्र इंग्रजीत आपले भाषण वाचत असताना त्यांनी ‘ओल्ड पोल्यूटिंग व्हेईकल्स‘ च्या जागी ‘ओल्ड पाॅलिटिकल‘ असा उच्चार केला. पटकन आपली चूक लक्षात येताच त्या थांबल्या, पण एव्हाना त्या काय म्हणणार होत्या, हे सर्व खासदारांच्या ध्यानात आले. आणि विरोधी बाकातून यावर एकच हशा पिकला. त्यावर सीतारामन देखील चुटकी घेत म्हणाल्या की, ‘वास्तविक माझे काही चुकले असे मला काही वाटत नाही. मला काय म्हणायचे हेही तुमच्या लक्षात आले.’ त्यांच्या या वक्तव्यावर तर सभागृहाने बाके वाजवून मनमुराद दाद दिली.

त्यानंतर सीतारामन पंतप्रधान आवास योजनेबद्दल बोलत होत्या, त्यावेळी सत्तारुढ बाकांवरुन ‘मोदी, मोदी‘ च्या घोषणा सुरु झाल्या. सदनात उपस्थित असलेल्या कॅमेरामनने एकदा मोदींवर तर एकदा घोषणा देणाऱ्या सत्तारुढ सदस्यांवर कॅमेरे फिरविण्यास सुरुवात केली. सदनातल्या भल्यामोठ्या स्क्रीनवर ते पाहत असलेले कॉंग्रेसचे खासदार ‘अरे आमच्यावरही एकदा कॅमेरे फिरवा’ असे एकाचवेळी ओरडले.

निर्मला सीतारामन यांचे बजेटचे भाषण सुरु झाल्यानंतर सुमारे दोन ते तीन मिनिटांनी कॉंग्रेस खासदारांचा एक घोळका सदनात शिरला. आणि त्यांनी ‘जोडो जोडो, भारत जोडो‘ च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावर अध्यक्ष ओम बिर्ला संबंधित खासदारांना उद्देशून म्हणाले, ‘हा जुड गया है, आप अपनी जगह पर बैठ जाओ‘. यावरही हशा पिकला.

      हेही वाचलंत का ?

 

Back to top button