आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्यातील तंत्रज्ञान : अर्थमंत्री | पुढारी

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे भविष्यातील तंत्रज्ञान : अर्थमंत्री

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी लोकसभेत त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात 5-जी सेवा वापरून वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्यासाठी सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तीन केंद्रे आणि अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100 प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील तंत्रज्ञान असून त्याच्या विकासासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगून सीतारामन म्हणाल्या, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी उत्कृष्टतेची तीन केंद्रे सर्वोच्च शैक्षणिक संस्थांमध्ये स्थापन केली जातील. उद्योगातील आघाडीचे ब्रँड, आंतरविद्याशाखीय संशोधन, अत्याधुनिक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन्स) विकसित करण्यासाठी आणि कृषी, आरोग्य, शाश्वत शहरे या क्षेत्रांमध्ये वाढीव समस्यांचे निराकरण करण्यासाठी भागीदारी करतील. सीतारामन म्हणाल्या की, 5-जी सेवा वापरून अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यासाठी विविध प्राधिकरणे, नियामक, बँका आणि इतर व्यवसाय यांच्या सहकार्याने अभियांत्रिकी संस्थांमध्ये 100 प्रयोगशाळा स्थापन केल्या जातील.

नवीन श्रेणीतील संधी शोधण्यासाठी, व्यवसाय मॉडेल आणि रोजगार क्षमता लक्षात घेण्यासाठी, प्रयोगशाळा इतरांबरोबरच, स्मार्ट क्लासरूम, उन्नत शेती, गतिमान वाहतूक प्रणाली आणि आरोग्य सेवा अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यात येतील, असेही सीतारामन यांनी सांगितले.

Back to top button