नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज (दि. २३) फेटाळून लावली. राजस्थानमधील अलवर येथे २०१८ साली योगी आदित्यनाथ यांनी प्रक्षोभक भाषण दिले होते, असे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेद्वारे करण्यात आली होती.
या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास आम्ही इच्छुक नाही. कारण अशा प्रकारचे खटले केवळ वृत्तपत्रांतील पहिल्या पानावर छापून येण्यासाठी दाखल केले जातात, अशी टिप्पणी न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याबाबतची मूळ याचिका फेटाळून लावली होती. शिवाय याचिका दाखल करणाऱ्याला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आले होते.