Republic Day 2023 : महाराष्ट्राच्या चित्ररथावर झळकणार 'साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि' | पुढारी

Republic Day 2023 : महाराष्ट्राच्या चित्ररथावर झळकणार 'साडेतीन शक्तिपीठे आणि नारी शक्त‍ि'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : प्रजासत्ताक दिनी (Republic Day 2023)  राजधानी दिल्लीत कर्तव्य पथावरील पथसंचलनातील मुख्य कार्यक्रमात यावर्षी महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्ति’ विषयावरील चित्ररथ साकारण्यात येतोय. छावणी परिसरातील रंगशाळेत या चित्ररथाच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू आहे. यावर्षी महाराष्ट्रासह १७ राज्यांची आणि विविध केंद्रीय मंत्रालयांची १० अशी एकूण २७ चित्ररथे कर्तव्यपथावर झळकतील.

महाराष्ट्र राज्याचे यापूर्वी ४० वेळा राजधानीत होणाऱ्या मुख्य पथसंचलनात चित्ररथ सादर झालेले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने (Republic Day 2023)  राज्याच्यावतीने ‘साडेतीन शक्त‍िपीठे आणि नारी शक्त‍ि’ या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ आहे. या माध्यमातून नारी शक्ति राज्यातील मंदिर शैली आणि लोककलाचा अमूर्त वारसा प्रदर्श‍ित केला जाईल.

महाराष्ट्र संताची आणि देवतांची भूमी आहे. महाराष्ट्रात महत्त्‍वाची साडेतीन शक्त‍िप‍ीठे आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची आई भवानी, माहूरची रेणुका माता हे तीन पूर्ण शक्त‍िपीठे आहेत. तर, वण‍ीची सप्तशृंगी हे अर्ध शक्त‍िपीठ आहे. या शक्तिपीठांना स्त्री शक्त‍ीचे स्त्रोत मानले जाते. यांना यावर्षी चित्ररथाच्या माध्यमातून दर्शविण्यात आलेले आहे.

Republic Day 2023  : गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती

चित्ररथाच्या पुढील दर्शनीय भागात गोंधळी, देवीचा भक्त संबळ वाद्य वाजवित असल्याची मोठी प्रतिकृती दर्शविली आहे. समोरील डाव्या व उजव्या भागात पारंपरिक लोककलेचे वाद्य वाजविणारे आराधी, गोंधळी यांची मध्यम आकाराची प्रतिमा आहे. त्यांच्यामागे फिरते मंदिर राहील. यात साडेतीन शक्तिपीठांमधील देवींची प्रतिमा आहेत. यामागे पोतराज आणि हलगी वाजविणारे देवीचे भक्तांची दोन मोठी प्रतिकृती दिसणार. त्यांच्या समोरील भागास लोककलाकार आराधी, भोपी, पोतराज लोककला सादर करणार आहेत. चित्ररथाच्या मागील भागास नारी शक्तिचे प्रतिनिधीत्व करणारी एक मोठी स्त्री प्रतिमा दिसणार आहे.

साडेतीन शक्तिपीठांचा महिमा सांगणारे “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” असे गीत संगीतबध्द रूपात ऐकू येणार आहे. यासोबतच कर्तव्य पथावरून सरकणाऱ्या चित्ररथासोबत डावी व उजवीकडे कलाकार नृत्य सादर करतील.

शुभ ऍड या संस्थेकडून चित्ररथाचे काम

या चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची आहे. शुभ ऍड ही संस्था चित्ररथाचे काम करीत असून, त्याला प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य कलाकारांचा चमू करीत आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले आहे. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहिले आहे. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समूह, ठाणे येथील आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button