Thackeray Shiv Sena -VBA alliance | अखेर शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, ठाकरेंचे सरकारला आव्हान | पुढारी

Thackeray Shiv Sena -VBA alliance | अखेर शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, ठाकरेंचे सरकारला आव्हान

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अखेर शिवशक्ती- भीमशक्ती युतीची (Uddhav Thackeray Shiv Sena -VBA alliance) घोषणा झाली आहे. गेल्या काही दिवसांत या युतीसाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज सोमवारी (दि.२३) शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी घोषणा केली. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party) आणि वंचित आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीचा निर्णय जाहीर केला. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

शिवसेना प्रमुखांचा आज जन्मदिवस आहे. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहात होता. तो क्षण आता आला आहे. प्रथम देशहित लक्षात ठेवून तसेच देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. नया रास्ता, नया रिश्ता या तत्त्वावर आपण पुढे जाऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा झाली असून त्यांनाही ही युती मान्य आहे. यामुळे महाविकास आघाडीचे घटक म्हणून तुम्हाला मान्यता देण्यास हरकत नाही. महाविकास आघाडीमध्ये सामंजस्यांचे राजकारण करण्याची नितांत गरत आहे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. वंचित सोबतची युती ही नवीन नात्याची सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपेक्षितांच्या राजकारणाची सुरुवात व्हावी यासाठी हा प्रयत्न आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. जिंकणे राजकीय पक्षांच्या हातात नाही, पण उमेदवारी देणे हातात आहे, असेही त्यांनी नमूद केले. शरद पवार आमच्या आघाडीसोबत येतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. शरद पवार यांच्यासोबत शेतातलं भांडण नाही, तर मुद्द्यांचं भांडण आहे. ईडीच्या माध्यमातून देशातील राजकीय नेतृत्व संपविण्याचा घाट घातला जात असल्याचे ते म्हणाले.

याआधी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली होती. दरम्यान, याआधी प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली, तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा विचार करू अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केली होती. त्यावेळीच ठाकरे आणि वंचित आघाडीच्या युतीचा मार्ग मोकळा झाला होता.

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्ती ही विचारांची युती असल्याचे खासदार संजय यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंसोबतची युती ही प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित युती असेल, असे मत वांचितचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी याआधी व्यक्त केले होते. सध्या मुंबई मनपाच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झालेली आहे. मुंबई मनपाच्या निवडणुका आम्हीसोबत लढणार आहोत. जागा वाटप निश्चित झाले आहे. ही युती लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही राहणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमच्यासोबत आले तरी आमची हरकत नाही, परंतु, या दोन्ही पक्षांना सोबत घ्यायचे की नाही हे ठाकरे ठरवतील, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले होते.

तर राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणे महत्त्वाचे होते. सर्वांनी एकत्र येऊन ताकद वाढविणे आवश्यक असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी मांडले आहे. (Uddhav Thackeray Shiv Sena -VBA alliance)

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे या युतीबाबत मौन

एकीकडे शिवशक्ती-भीमशक्ती युतीची घोषणा झाली असली तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीने या युतीबाबत मौन बाळगले आहे. शिवसेनेचा मित्रपक्ष म्हणून वंचित आघाडी पुढे जाते की महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून मान्यता मिळते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा :

Back to top button