कर्नाटकमधील ‘रोड शो’वेळी पंतप्रधान मोदींना पुष्पहार घालण्यासाठी तरुणाने तोडले ‘सुरक्षा’ कडे | पुढारी

कर्नाटकमधील 'रोड शो'वेळी पंतप्रधान मोदींना पुष्पहार घालण्यासाठी तरुणाने तोडले 'सुरक्षा' कडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील हुबळी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शो दरम्यान एका तरुणाने पंतप्रधानांचे सुरक्षा कडे तोडून त्यांना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदी विमानतळावरून राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. यामध्ये सुरक्षा कर्मचारी त्या तरूणाला खेचताना दिसत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हुबळी दौऱ्यावर आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे त्यांनी उद्घाटन केले. या महोत्सवात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशातील युवक-युवती सहभागी झाल्या आहेत. याआधी हा कार्यक्रम बेळगावात घेण्यात येणार होता. मोदींचा हा दौरा महिनाभरापूर्वीच निश्चित झाला होता. हुबळीला युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने आज पंतप्रधान मोदी हुबळीला आले होते.

पंतप्रधान मोदी विमानतळावरून राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना हुबळी येथे रोड शो केला. यावेळी एका तरुणाने पंतप्रधान मोदींचे सुरक्षा कवच तोडून त्यांना पुष्पहार अर्पण करण्याचा प्रयत्न केला. तो तरूण गर्दीतून पळत पंतप्रधान मोदींना घेऊन जाणाऱ्या वाहनाजवळ गेला आणि पुष्पहार अर्पण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा कर्मचार्‍यांनी त्याला बाजूला केले.

 इंडिया टुडेने दिलेल्‍या वृत्तानुसार, ज्या रस्त्यावर ही घटना घडली त्या रस्त्याचा संपूर्ण भाग स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपने (एसपीजी) सुरक्षित केला होता आणि पंतप्रधान मोदींनी त्या तरुणाला पुष्पहार घालण्याची परवानगी दिली होती. राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते हुबळी येथील रेल्वे क्रीडा मैदानावर झाले. या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, अनुराग सिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

Back to top button