चीनच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष : लष्करप्रमुख मनोज पांडे | पुढारी

चीनच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष : लष्करप्रमुख मनोज पांडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर सीमेवर सध्या शांतता असली तरी चीनच्या प्रत्येक हालचालीकडे आमचे लक्ष आहे, असे प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. लष्करी पातळीवर तसेच कुटनीतीच्या माध्यमातून चर्चा सुरु असली तरी कधी काय होईल, याचा नेम नाही, अशी टिप्पणीही पांडे यांनी केली.

चीनसोबत असलेल्या सातपैकी पाच मुद्यांवर तोडगा निघालेला आहे, असे सांगत जनरल पांडे पुढे म्हणाले की, उत्तर सीमेवर चीनकडून सैन्याची मोर्चेबांधणी चालू आहे. दुसरीकडे त्यांच्या तोडीची सज्जता भारतीय लष्कराने केलेली आहे. लष्कराकडे पुरेशी साधनसामुग्री आहे. पूर्व विभागात चीनने काही प्रमाणात सैनिक वाढविले आहेत. आगामी काळात लष्कराच्या आर्टिलरीमध्ये महिलांना संधी दिली जाउ शकते, असेही पांडे यांनी नमूद केले.

2021 साली पाकसोबत शस्त्रसंधी करार झाला होता. त्यानंतर तिकडून होणारा गोळीबार कमी झालेला आहे. मात्र दहशतवाद आणि दहशतवादी कृत्यासाठी आवश्यक ती मदत पाकिस्तान करीत आहे, असे सांगतानाच ईशान्येकडील बहुतांश राज्यांत शांतता प्रस्थापित झाली असल्याची माहिती पांडे यांनी दिली. जोशीमठ येथे जमीन धसत असल्याच्या मुद्यावर विचारले असता ते म्हणाले की, जोशीमठ येथील सैनिकांना सुरकि्षत स्थळी हलविण्यात आले आहे. लष्कराच्या सुमारे 25 इमारतींना भगदाड पडलेले आहे. गरज पडली तर औली येथे काही सैनिक कायमस्वरुपी ठेवले जाईल. जोशीमठ येथे लोकांची मदत केली जात आहे. येथे हेलिपॅड, रुग्णालय आदी सुविधा स्थानिक प्रशासनाला उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button