बेरोजगार तरूणाला जीएसटी कार्यालयाची ‘१ कोटी ३९ लाख रुपये’ कर भरण्याची नोटीस | पुढारी

बेरोजगार तरूणाला जीएसटी कार्यालयाची '१ कोटी ३९ लाख रुपये' कर भरण्याची नोटीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानच्या जैसलमेरमध्ये राहणाऱ्या एका गरीब बेरोजगार तरूणाला एक कोटी रूपयांपेक्षा अधिक जीएसटी कर भरण्याची नोटीस मिळाली आहे. नोटीस पाहताच संपूर्ण कुटुंबाची झोप उडाली. तरूणाच्या नावावर जीएसटी कर थकीत आहे, तो लवकर न भरल्यास कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. ही नोटीस केंद्रीय आयुक्तालय दिल्ली उत्तरकडून पाठवण्यात आली आहे.

दिल्लीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने तरूणाचे पॅनकार्ड चुकीच्या पद्धतीने वापरून करोडोंची उलाढाल केली. यानंतर केंद्रीय जीएसटी विभागाने जैसलमेरच्या या गरीब तरूणाला १ कोटी ३९ लाख ७९ हजार ४०७ रूपयांची जीएसटी नोटीस दिली. या तरूणाने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस अधीक्षकांनी संबंधीत पोलिस ठाण्याला या प्रकरणाचा तपास करून गुन्हा नोदविण्याचे निर्देश दिले आहेत.

नरपतराम मेघवाल (वय २५) असे या तरूणाचे नाव आहे. त्याने सांगितले की,  सध्या तो बेरोजगार आहे. तो शिक्षक भरतीच्या परिक्षेची सुरतगडमध्ये तयारी करतो. त्याचे वडील नवल राम हे शेती करतात. त्याला सेंट्रल जीएसटी विभागाकडून तीन दिवसांपूर्वी एक नोटिस मिळाली आहे. त्यामध्ये १ कोटी ३९ लाख ७९ हजार ४०७ रूपये कर थकीत असल्याचे सांगण्यात आले. त्याला ९ जानेवारी २०२३ दिल्लीत बोलावण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक भंवर सिंह यांनी सांगितले की, पीडित तरूणाची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली आहे. संबंधीत पोलिस ठाण्याला कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचा :

Back to top button