शरद पवारांना दिलेली ‘जाणता राजा’ ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ | पुढारी

शरद पवारांना दिलेली 'जाणता राजा' ही पदवी मला योग्य वाटते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानाचे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथे समर्थन करीत अजित पवारांनी संभाजी महाराजांचा अपमान केलेला नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवारांना ‘जाणता राजा’ ही पदवी योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला.

नाशिक येथे भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजप नेते नेहमीच महापुरुषांना कमी लेखण्याचे काम करतात. भाजप नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवर पांघरूण घालण्यासाठी वाद सुरू आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला एका वर्गाने विरोध केला. मग शिवाजी महाराज आमचे प्रतिपालक नाही का? असा प्रतिप्रश्न भुजबळांनी केला. आरोप-प्रत्यारोप थांबले पाहिजेत. संभाजीराजे यांनी स्वराज्याचे रक्षण केले म्हणून त्यांना स्वराज्यरक्षक म्हटले. परंतु, कुणाला धर्मवीर म्हणायचे असेल तर म्हणू शकता. त्यास कुणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. अजित पवार यांचे विधान चुकीचे होते, तर संबंधितांनी त्याच वेळी विधानसभेत सांगायला हवे होते. बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण याबाबत खरे तर विचार व्हायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खूप मोठा आहे. एक-दोन पानांत मुलांना इतिहास समजतो का, पण बऱ्याचदा इतिहास वगळला जातो. सर्वच आपली दैवते आहेत. त्यामुळे कुणी धर्मवीर म्हणा, कुणी स्वराज्यरक्षक म्हणा असा सल्लाही त्यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडीला राष्ट्रवादीचा विरोध नाही. अनेक पक्ष एकमेकांवर टीका करतात. मात्र निवडणुका आल्या की, ते एकत्र येतात. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, याप्रमाणे सर्वकाही सुरू आहे. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभा घेणार असतील, तर चांगलेच आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मजबूत होईल, असाही दावा भुजबळांनी केला.
महाराष्ट्र भवन सर्वत्र करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरूनही भुजबळ यांनी टीका करीत, काशी आहे, रामेश्वर असल्याने त्यांनी सगळीकडे जावे. अष्टविनायकही करावे आणि आशीर्वाद घ्यावा. मात्र त्यांनी कामाचा झपाटा कमी होऊ देऊ नये, असा सल्ला दिला. मुंबई उद्योगपतींचे हब आहे. त्यामुळे ज्याला जे हवे त्यांनी ते न्यावे. महाराष्ट्र भवनदेखील सगळीकडे करा, असा सल्लाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला.

हेही वाचा :

Back to top button