संगमनेर : आ. थोरातांमुळे जिल्हा विकास नियोजनमधून कामांना 6.80 कोटी : इंद्रजीत थोरात | पुढारी

संगमनेर : आ. थोरातांमुळे जिल्हा विकास नियोजनमधून कामांना 6.80 कोटी : इंद्रजीत थोरात

 संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते, आ. बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये निळवंडे कालव्यांसह तालुका विकास कामांसाठी मोठा निधी मिळवला होता. गेल्यावर्षीही अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या, विविध रस्ते यांसह विविध विकास कामांच्या मागणीसह पाठपुराव्यातून जिल्हा विकास नियोजनमधून कामांना 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे इंद्रजीत थोरात यांनी म्हणाले. इंद्रजीत थोरात म्हणाले की, सातत्याने विकासातून वाटचाल करणार्‍या संगमनेर तालुक्याच्या प्रत्येक गावासाठी आ. थोरात यांनी मोठा निधी मिळविला.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या विविध विकास कामांना जिल्हा नियोजन समितीने मंजुरी दिली. या अंतर्गत संगमनेर तालुक्यातील अंगणवाडी 4 खोल्यांना 45 लाख रुपये, जनसुविधा योजनेंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवणे, दशक्रिया विधी घाटाचे सुशोभीकरण, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसवणे, सोलर लॅम्प बसवणे व सुशोभीकरण कामांना 56 लाख रुपये निधी मिळाला. प्राथमिक शाळेच्या 8 खोल्यांसाठी 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला. नागरी सुविधांमधून चंदनापुरी येथे श्रीसाईबाबा मंदिर परिसर स्वच्छतागृह बांधण्यास 12 लाख रुपये, साकुर येथे सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्तीस 7 लाखाचा निधी मिळाला. ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांकरीता 1 कोटी 5 लाख रुपये, संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणास 3 कोटी 10 लाख असा एकूण 6 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मिळाला.

विविध गावांमध्ये होणार्‍या या विकास कामांच्या निधी करीता आ. बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कवठे धांदरफळ, वेल्हाळे, पिंपळगाव माथा, निळवंडे येथे अंगणवाडी खोल्या उभारण्यात येणार आहेत. जि. प. प्राथमिक शाळेच्या खोल्या जांभुळवाडी, तळेगाव, शेळकेवाडी, कसबावाडी, पोखरी हवेली, साकुर व राजापूर येथे बांधण्यात येणार आहे. जनसुविधा योजनेंतर्गत मेंगाळवाडी, निमगाव खुर्द, सावरगाव तळ, निमोन, निळवंडे, चिंचोली गुरव आदी येथे कामे सुरू होतील, असे इंद्रजीत थोरात म्हणाले.

विकास कामांना मोठ्या निधीची मागणी केली

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या कालव्यास मोठा निधी मिळून ही कामे दिवस-रात्र सुरू ठेवले होते. तालुक्यात रस्ते, अंगणवाडी, प्राथमिक शाळा खोल्या व विविध विकास कामांना मोठ्या निधीची मागणी केली होती, मात्र सत्ता बदल झाल्याने अनेक विकास कामांना स्थगिती मिळाली होती.

Back to top button