नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे | पुढारी

नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रमुख नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे तपास संस्था अर्थात सीबीआयने हाती घेतला आहे.

सीबीआयने यासंदर्भात गुन्हा दाखल केला असून तपासासाठी सहा अधिकार्‍यांच्या पथकाची स्थापना केली आहे.

वाघंबरी मठात गेल्या सोमवारी नरेंद्र गिरी यांचा मृतदेह आढळून आला होता.

श्वास गुदमरल्यामुळे नरेंद्र गिरी यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात दिसून आले होते.

अध्यात्मिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे संत समाजात अस्वस्थता पसरलेली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मृत्यू प्रकरणाचा तपास लगोलग सीबीआयकडे सुपूर्द करण्याची शिफारस केली होती.

सोमवारी सायंकाळी जेवण केल्यानंतर नरेंद्र गिरी एका खोलीत गेले होते. नंतर त्यांच्या अनुयायांनी दार ठोठावूनही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला होता.

त्यावेळी नरेंद्र गिरी फासावर लटकले असल्याचे दिसून आले होते. घटनास्थळी एक पत्रही सापडले होते.

त्यात आपल्याला काही लोक त्रास देत असून त्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले होते.

नरेंद्र गिरी यांनी ज्या लोकांनी नावे पत्रात घेतली होती, त्या आनंद गिरी, आद्या प्रसाद, संदीप तिवारी यांना पोलिसांनी अटक केलेली आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा या तिघांविरोधात दाखल करण्यात आलेला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्याने शंका

आखाडा परिषद अध्यक्षांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात आणखी एक धक्‍कादायक गोष्ट समोर आली आहे.

घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यावेळचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

विशेष म्हणजे, जमिनीवर महंतांचा मृतदेह दिसत असून, खोलीतील पंखा मात्र यावेळी चालू स्थितीत होता.

पोलीस महानिरीक्षक के. पी. सिंह यासंदर्भात नरेंद्र गिरी यांच्या मठात राहणार्‍या शिष्यांची चौकशी करत असतानाही व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

ज्या खोलीत महंतांचा मृतदेह फासाला लटकलेल्या अवस्थेत मिळाला, त्याच खोलीतील 1.45 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे.

व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह जमिनीवर ठेवल्याचे दिसत आहे,

बाजूलाच महंतांचा कथित आत्महत्या पत्रात उत्तराधिकारी म्हणून उल्लेख असलेला बलबीर गिरी उभा असल्याचे दिसत आहे.

याच व्हिडिओमध्ये पंखाही चालू स्थितीत दिसत आहे.

पंख्याच्या रॉडमध्ये तसेच महंतांच्या गळ्यात नॉयलॉनच्या दोरीचा एक तुकडा दिसत आहे.

पोलीस महानिरीक्षक सिंह शिष्यांकडे चौकशी करत असताना सुमीत नावाचा शिष्य पंखा मी सुरू केल्याचे सांगत आहे.

मात्र, सिंह याविषयी आणखी विचारणा करत असताना तो अन्य मुद्दे सांगू लागतो.

हेही वाचा: 

Back to top button