लंडन : कोलंबिया मध्ये पुरातत्त्व संशोधकांनी उत्खननात आठ सिरॅमिकची भांडी शोधून काढली आहेत. या भांड्यांमध्ये धातूच्या छोट्या मूर्ती आणि पाचू आहेत. एक प्राचीन मंदिर आणि शेजारच्या दफनभूमीदरम्यान हे उत्खनन करण्यात आले.
सहाशे वर्षांपूर्वीचे हे सिरॅमिकचे जार 'ऑफे्रंडेटेरिअस' म्हणून ओळखले जातात. प्राचीन म्युस्का किंवा चिबचा लोकांनी हे जार तयार केले होते. या भागात पूर्वी म्युस्का लोकांची एक संस्कृती विकसित झाली होती. हे लोक धातूच्या कलाकृती बनवण्यात कुशल होते. 'एल डोरॅडो' नावाच्या सोन्याने बनलेल्या नगरीबाबतची दंतकथा यामुळेच निर्माण झाली असावी असे संशोधकांना वाटते.
सन 1537 ते 1540 या काळात स्पॅनिश लोकांनी हा भाग जिंकून घेतला. त्या संघर्षात आणि रोगराईत अनेक म्युस्का लोक मृत्युमुखी पडले. मात्र, अद्यापही त्यांचे हजारो वंशज पाहायला मिळतात.
कोलंबिया ची राजधानी असलेल्या बोगोटाजवळील म्युस्का संस्कृतीमधील एका प्राचीनस्थळी उत्खननात हे सिरॅमिकचे जार मिळाले आहेत. त्यामधील काही कलाकृती साप व अन्य प्राण्यांसारखे असून काही मानवाकृती आहेत.