दूध दर : ‘कात्रज’ने केली शेतकर्‍यांची दिवाळी गोड, ७ कोटींचा देणार बोनस | पुढारी

दूध दर : 'कात्रज'ने केली शेतकर्‍यांची दिवाळी गोड, ७ कोटींचा देणार बोनस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज दूध) दूध उत्पादक शेतकर्‍यांना प्रति लिटरला दूध दर फरकापोटी एक रुपया दराप्रमाणे ७ कोटी ९० लाख रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कात्रज संघाकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांची दिवाळी गोड होणार आहे.

तसेच सध्या बँकेतील ठेवींचे व्याज दर पाच टक्क्यांपर्यंत घसरलेले असतानासुध्दा सभासद संस्थांना त्यांच्या शेअर्सवर १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. त्यापोटी १ कोटी ४ लाख रुपयांचे वाटपही करण्याचा निर्णय झाला आहे. कात्रज दूध संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२३) रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.

ऑनलाईनद्वारे झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस ६४४ दूध संस्था प्रतिनिधींनी सहभागी होऊन खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.

राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाचे (एनडीडीबी) मुंबईचे विभाग प्रमुख अनिल हातेकर यांच्यासह सर्व संचालक मंडळ सभेस उपस्थित होते. संघास वेळोवेळी मार्गदर्शन केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दुग्धविकास मंत्री सुनिल केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे व सभेस उपस्थित शेतकर्‍यांचे आभार संघाचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के यांनी मानले.

अक्रियाशील संस्थांना मतदानाचा अधिकार नको

कात्रज दूध संघास ज्या संस्था दूध पुरवठा करीत नाहीत. अशा अक्रियाशिल दूध संस्थांना संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देवू नये. यासाठी संघाने न्यायालयात जावे.

तसा ठराव सर्व क्रियाशील दूध उत्पादक संस्थांकडून मांडण्यात येवून तो सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी कळविली आहे.

हेही वाचलंत का? 

कोरोना साथीच्या काळातही नियोजनपूर्वक व योग्य खबरदारी घेत संघाच्या संचालक मंडळाने आर्थिक घडी विस्कळित होऊ दिली नाही. संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री वाढविण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण भागात २५२ आधुनिक मिल्क पार्लर्स सुरु केली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर येथेही वितरण चालू केलेले आहे. संघाची सर्व उत्पादने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असल्यामुळेच ग्राहकांकडून मागणी वाढत आहे.
– विष्णू हिंगे (चेअरमन, कात्रज दूध संघ)

Back to top button