Aadhaar Update : आता पत्त्याच्या पुराव्याशिवायही आधार कार्ड होणार अपडेट, जाणून घ्‍या प्रक्रिया

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आधार कार्ड हे देशातील प्रत्‍येक नागरिकांसाठी महत्त्‍वाचे ओळखपत्र आहे. अनेक सरकारी कामांमध्येही याचा वापर केला जातो. आता आधार कार्ड अपडेट करताना पत्त्याच्या पुराव्याची गरज भासणार नाही, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने ( UIDAI ) स्‍पष्‍ट केले आहे.  Aadhaar Update मधील नवीन बदलाविषयी जाणून घेवूया…

पत्त्याच्या पुराव्याऐवजी कुटुंबप्रमुखाची परवानगी ठरेल पुरेशी

UIDAI ने आज जाहीर केलेल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, "आता यापुढे आधार कार्ड घराच्‍या पत्त्याच्या पुराव्याशिवायही ऑनलाईन अपडेट होणार आहे. यासाठी तुम्‍हाला केवळ कुटुंब प्रमुखाची परवानगी घ्‍यावी लागणार आहे. कुटुंब प्रमुखाच्या संमतीने आधारमध्ये पत्ते ऑनलाइन अपडेट करण्याची परवानगी दिली आहे."

Aadhaar Update : 'ही' कागदपत्रे पुरावा म्‍हणून अनिवार्य

रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी नातेसंबंधांच्या कागदपत्रांचा पुरावा सादर केल्यानंतर, अर्जदार आणि कुटुंब प्रमुख (HOF) या दोघांचे नाव आणि त्यांच्यातील संबंध यांचा उल्लेख केल्यानंतर आधार कार्ड ऑनलाईन अपडेटची नवीन प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. प्रक्रियेसाठी HOF द्वारे OTP-आधारित प्रमाणीकरण आवश्यक आहे, असेही निवेदनात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

Aadhaar Update : अशी असेल प्रक्रिया…

रहिवासी ऑनलाइन पत्ते अपडेट करण्यासाठी 'माय आधार' पोर्टलला भेट द्‍यावी. यानंतर, कुटुंब प्रमुखाचा आधार क्रमांक प्रविष्ट करण्याची परवानगी दिली जाईल. गोपनीयता राखण्यासाठी कुटुंब प्रमुखाच्‍या आधारची कोणतीही माहिती स्क्रीनवर दिसणार नाही. कुटुंब प्रमुखाच्‍या आधार क्रमांकाचे यशस्वी प्रमाणीकरण झाल्यानंतर, रहिवाशांना नातेसंबंधाचा पुरावा दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक असेल. या सेवेसाठी नागरिकांना ५० रुपये शुल्‍क भरावे लागेल. पत्त्याच्या विनंतीबद्दल कुटुंब प्रमुखाला एसएमएस पाठवला जाईल. त्‍यांनी एसएमएस मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत माय आधार पोर्टलवर लॉग इन करून संमती द्यायची आहे. यानंतर विनंतीवर प्रक्रिया केली जाईल, असे UIDAI ने निवेदनात म्हटले आहे. कुटुंबप्रमुखांनी विनंती नाकारल्‍यास अर्जदाराला रक्कम परत केली जाणार नाही, असेही निवेदनात स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

स्‍थलांतरीत नागरिकांना होणार नव्‍या सुविधेचा लाभ

रोजगार आणि शिक्षण या कारणांसाठी लाखो नागरिक देशातील विविध शहरे आणि गावांमध्‍ये स्‍थलांतरित होत असतात. त्‍यांना आधार कार्ड अपडेट करताना पत्ता अपडेट करण्‍यासाठी पत्त्‍याचा पुरावा अनिवार्य होता. मात्र स्‍थलांतरित नागरिकांसाठी असा पुरावा देणे गैरसोयीचे होते. नागरिकांच्‍या गैरसोयीचा विचार करता आता UIDAI ने यासाठी नवीन पर्याय दिला आहे.

आधार कार्डमध्‍ये पत्ता अपडेट करण्‍यासाठी संबंधितांना कुटुंबप्रमुखांची ( पती किंवा पत्‍नी ) परवानगी आवश्‍यक असेल. या सुविधेमुळे स्‍थलांतरीत नागरिक व विद्यार्थ्य्रांना आपलं आधार कार्ड अपडेट करणे अधिक सुलभ होणार आहे, असेही UIDAI ने आपल्‍या निवेदनात नमूद केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news