Jaydev Unadkat : उनाडकटचा चमत्कार! ‘रणजी’त पहिल्याच षटकात केली हॅट्ट्रिक | पुढारी

Jaydev Unadkat : उनाडकटचा चमत्कार! ‘रणजी’त पहिल्याच षटकात केली हॅट्ट्रिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : सौराष्ट्राचा कर्णधार जयदेव उनाडकटने (Jaydev Unadkat) दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत इतिहास रचला. रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेणारा तो पहिला क्रिकेटर ठरला आहे.

उनाडकटने (Jaydev Unadkat) षटकाच्या तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या चेंडूवर ध्रुव शौरे, वैभव रावल आणि कर्णधार यश धुल यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अनाडकटने अवघ्या 39 धावांत 8 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने अवघ्या 12 चेंडूत पाच बळींचा टप्पा पूर्ण केला. अखेर दिल्लीचा पहिला डावात 35 षटकांत 133 धावांवर गारद झाला. चिराग जानी आणि प्रेरक मंकड यांनी एक-एक बळी मिळवला.

दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि सौराष्ट्रसाठी उनाडकटला (Jaydev Unadkat) पहिले षटक टाकण्याची संधी मिळाली. पहिले दोन चेंडू टाकल्यानंतर तिसर्‍या चेंडूवर उनाडकटने ध्रुव शौरेला (0) क्लिन बोल्ड केले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर वैभव रावलला (0) हार्विक देसाईकरवी झेलबाद केले. षटकाच्या पाचव्या चेंडूवर उनाडकटने दिल्लीचा कर्णधार यश धुलला (0) एलबीडब्ल्यू बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि ऐतिहासिक खेळीची नोंद केली.

सामन्याच्या पहिल्या दिवशी उनाडकटचे वर्चस्व राहिले. त्याच्या हॅट्ट्रिकनंतर दिल्लीचा डाव गडगडला. दिल्लीकर फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करून सौराष्ट्रला एकापाठोपाठ एक विकेट बहाल केल्या. दिल्लीने आपल्या 8 विकेट केवळ 53 धावांवरच गमावल्या. यातील पाच फलंदाजांना एकही धाव काढता आली नाही आणि ते शून्यावर तंबूत परतले. पहिल्या षटकात कंबरडे मोडल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या तिस-या चेंडूवर दिल्लीची चौथी विकेट पडली. चिराग जानीने आयुष बडोनीला (0) बाद केले. जय गोहिलने त्याचा झेल पकडला. यानंतर पुन्हा एकदा उनाडकटने दिल्लीला सलग तीन झटके दिले. त्याने जॉन्टी सिद्धू (4), ललित यादव (0), लक्ष्य थरेजा (1) यांना गुंडाळले. यावेळी दिल्लीची अवस्था 5 षटकांत 7 बाद 10 धावा अशी झाली. यानंतर हृतिक शोकीनने प्रांशु विजयरनच्या साथीने दिल्लीचे अर्धशतक धावफलकावर झळकावले. ही जोडी प्रेरक मंकडने फोडली. त्याने 53 धावांवर विजयरनला (15) माघारी धाडले. शोकीनने पुन्हा एकदा शिवांक विशिष्ठसोबत दिल्लीचा डाव सांभाळला. दोघांनी नवव्या विकेटसाठी 80 धावांची भागिदारी रचली आणि संघाचे शतक पूर्ण केले. जमलेल्या या जोडीला उनाडकटने सुरुंग लावला. त्याने 3.5 व्या षटकात 133 धावसंख्येवर शिवांक विशिष्ठला (38) जय गोहिल करवी झेलबाद केले. यानंतर पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवचा अडसर दूर करून दिल्लीचा ऑलआऊट केला.

सौराष्ट्रची धडाकेबाज सुरुवात

133 धावांवर दिल्लीचा डाव गुंडाळल्यानंतर सौराष्ट्र फलंदाजीस मैदानात उतरले. त्यांनी दिवसाअखेर 33 षटकात 1 बाद 132 धावा फटकावल्या. या दरम्यान, हार्विक देसाईने 12 चौकारांच्या मदतीने 92 चेंडूत नाबाद 72 धावा फटकावल्या. जय गोहिल 34 धावा करून बाद झाला. चिराग जानी 24 धावांवर खेळत असून सौराष्ट्र अजून एका धावेने मागे आहे.

पठाणने कराचीत केला होता चमत्कार

उनाडकटपूर्वी माजी भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्याच्या पहिल्याच षटकात हॅट्ट्रीक घेण्याचा विक्रम केला आहे. डावखु-या इरफाने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्याच षटकात हॅटट्रिक घेऊन यजमान संघाचे कंबरडे मोडले होते. त्याने 2006 मध्ये कराचीच्या मैदानात हा चमत्कार केला होता. इरफानने पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सलमान बट, पाचव्या चेंडूवर युनूस खान आणि सहाव्या चेंडूवर मोहम्मद युसूफ यांना बाद केले होते.

Back to top button